...आणि मानवी हातांपुढे अजस्त्र मशीन्सही झाल्या फेल! प्रयत्नांची पराकाष्ठा अखेर आली फळाला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:59 AM2023-11-29T07:59:33+5:302023-11-29T07:59:49+5:30
Uttarkashi Tunnel Accident: उत्तराखंडच्या सिल्क्यारा-दांदलगाव बोगद्यात मागील १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणांकडून रात्रंदिवस युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. त्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि विशेष मशिनरींचा वापर करण्यात आला. त्याबाबत..
उत्तराखंडच्या सिल्क्यारा-दांदलगाव बोगद्यात मागील १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ कामगारांच्या सुटकेसाठी विविध यंत्रणांकडून रात्रंदिवस युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. त्यासाठी विविध तंत्रज्ञान आणि विशेष मशिनरींचा वापर करण्यात आला. त्याबाबत..
ऑगर मशीन
बोगद्यात पडलेल्या मलब्यात ड्रिलिंग करून त्यात पाइप टाकून बचावकार्य करण्यासाठी ऑगर मशीन दिल्लीहून एअरलिफ्ट करून आणण्यात आली.
ही मशीन दर तासाला ५ मीटरपर्यंत ड्रिलिंग करत त्यातील मलबा बाहेर टाकण्याचे काम करते, तसेच ड्रिलिंग केल्यानंतर त्यात पाइपलाइन टाकण्याचेही काम करते.
मशीनला सर्पगोलाकार (सर्कुलर) स्क्रू ब्लेडिंग असतात. त्यास बरमा म्हणून ओळखले जाते. ती शाफ्टच्या माध्यमातून गोलाकार फिरत ड्रिलिंग करत जाते.
प्रामुख्याने पाइपलाइन वा केबल टाकण्यासाठी ही मशीन वापरली जाते.
- आइस ऑगर, अर्थ ऑगर, ग्रेन ऑगर, हँड ऑगर, तसेच गार्डन ऑगर असे ऑगर मशीनचे विविध प्रकार आहे.
प्लाझ्मा कटर
बोगद्यातील अडथळ्यांमुळे ऑगर मशीनचे ब्लेड्स तुटून ते मलब्यात रुतून बसले होते. ते बाहेर काढण्यासाठी हैदराबादहून प्लाझ्मा कटर बोलावण्यात आले.
एक प्रकारची गॅस कटरसारखी असलेली ही यंत्रणा धातूंचे अडथळे वितळविण्यासाठी वापरली जाते.
आयोनाइज्ड गॅसद्वारे चालणारे हे कटर प्रामुख्याने ऑटोमोबाइल रिपेरिंग, मोठे पोलादी ढाचे कापणे, तसेच स्क्रॅपिंगसाठी वापरले जाते.
व्हर्टिकल ड्रिलिंग
ऑगर मशीनमध्ये अडथळे आल्याने पर्यायी मार्ग म्हणून डोंगरावरून जवळपास ३२० मीटरपर्यंत व्हर्टिकल ड्रिलिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यासाठी लागणारी यंत्रणा डोंगरावर नेण्यासाठी बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने खास रस्ता तयार केला.
एन्डोस्कोपिक कॅमेरा
- अडकलेल्या कामगारांपर्यंत एन्डोस्कोपिक कॅमेरा पाठविण्यात आणि त्याद्वारे त्यांच्याशी संवाद साधण्यात २१ नोव्हेंबरला यश आले.
- बेळगावच्या पाणीपुरवठा योजनेसाठी एल ॲण्ड टी कंपनीकडे असलेला अतिशय छोटा एन्डोस्कोपिक केबल कॅमेरा तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आला.
- कॅमेऱ्याच्या मदतीने व्हिडीओ माध्यमातून अडकलेल्या कामगारांना प्रत्यक्ष पाहता आले.
रॅट माइनिंग
ऑगर मशीनचे तुकडे बाहेर काढल्यानंतर त्या जागेतून पुढील खोदकाम मानवी हाताने करण्यासाठी बचावकार्यातील शेवटचा पर्याय म्हणून रॅट मायनर्सची मदत घेतली.
उंदरांप्रमाणे कमी जागेत खोदकाम करण्याचे विशिष्ट कौशल्य
त्यांच्याकडे असते.
रोबोटिक्स
कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी रोबोटिक्सची मदत घेण्यात आली. त्यासाठी लागणारी यंत्रणा आणि तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले.
कामगारांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणे, वायूपुरवठा सुरळीत ठेवणे, बोगद्यात विषारी वायू तयार झाल्यास तो शोधणे, तसेच दूरसंचार सुविधा उपलब्ध करण्यासाठी रोबोटिक्सचा वापर करण्यात आला.