हैदराबाद - रस्ते अपघातात आपल्या देशामध्ये दरवर्षी हजारो लोकांचा बळी जातो. सरकार त्यासाठी कडक कायदे करत असते, मात्र प्रत्येकजण ते कायदे-नियम पाळत नाहीत. दुचाकी चालवत असताना चालकाच्या सुरक्षेसाठी हेल्मेट गरजेच आहे. हे टिव्ही, वर्तमानपत्राच्या माध्यमातून समजावण्यात आलं आहे, मात्र तरीही काही लोक दुचाकीवर असल्यावर हेल्मेटतर वापरत नाहीतच त्याशिवाय अन्य नियमही मोडत असतात. वाहतुकीचे साधेसोपे नियम आहेत. आपल्या सुरक्षेसाठी प्रत्येकाने ते पाळलेच पाहिजे , पण भारतात असं होताना दिसत नाही.वाहतुक पोलिस लोकांमध्ये याबाबत जनजागृती करतात. मात्र लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष करताना अनेक वेळा दिसून आलं. शेवटी लोकांच्या अशा बेजबाबदार वागण्यापुढे एका पोलिसाने हात जोडले आहेत. आंध्र प्रदेशमधले पोलीस निरिक्षक बी शुभ कुमार यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्ते सुरक्षा आणि अपघात या विषयावर बोलण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती देखील कुटुंबासोबत उपस्थित होता.शुभ कुमार यांचे व्याख्यान ऐकून त्याच्यावर काडी मात्र परिणाम झाला नाही.
आपल्या दोन मुलांना दुचाकीच्या टाकीवर आणि मागे पत्नी आणि आई असं पाच जणांचं कुटुंब घेऊन तो दुचाकीवरून चालला होता. एकानेही हेल्मेट घातलं नव्हतं. शुभ यांनी त्याला वाटेत अडवले. रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीवर एवढं समजून सांगितल्यानंतरही त्याच्यावर काहीच फरक पडला नाही हे पाहून शेवटी हतबल होऊन कुमार यांनी त्याच्यापुढे हात टेकले.