नवी दिल्लीः देशाच्या लोकसभेत आज एक अद्भुत आणि ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडताहेत, एकमेकांच्या अंगावर धावून जाताहेत, हे चित्र आपण अनेकदा पाहिलंय. पण, आज मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्यानंतर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींजवळ जात त्यांना चक्क मिठी मारली आणि सगळेच अवाक झाले.
अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांचं भाषण अनेक अर्थांनी गाजलं. त्यांनी मारलेले टोमणे, बोलता-बोलता झालेल्या चुका, मोदी सरकारवर केलेली टीका आणि त्यावरून झालेला गदारोळ अशा नाट्यमय घडामोडी या भाषणावेळी घडल्या. पण, या भाषणाच्या शेवटाने सगळ्यांना अनपेक्षित धक्का दिला.
काँग्रेस ही एक भावना आहे. ती भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन, असं म्हणून राहुल यांनी भाषण संपवलं आणि ते वेलमधून थेट मोदींच्या खुर्चीकडे गेले. त्यांनी मोदींना आलिंगनासाठी उभं राहण्याची विनंती केली. पण, ते उभे राहत नाहीत, असं पाहून राहुल यांनी स्वतःच पुढे होत त्यांना मिठी मारली.
काय म्हणाले राहुल...
सगळ्या विरोधकांना आणि तुमच्यातल्या काही लोकांना घेऊन आम्ही पंतप्रधानांना हरवणार आहोत. माझ्या मनात पंतप्रधाबद्दल राग, द्वेष नाही. उलट, मोदी आणि भाजपाचा मी आभारीच आहे. त्यांनीच मला काँग्रेसचा अर्थ सांगितला. भारतीय असण्याचा अर्थ सांगितला. धर्म शिकवला. शिवाचा अर्थ सांगितला. हिंदू असण्याचा अर्थ सांगितला. यापेक्षा मोठी गोष्ट असूच शकत नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे. तुमच्यासाठी मी पप्पू आहे. तुम्ही मला कितीही शिव्या देऊ शकता, पण माझ्या मनात तुमच्याबद्दल किंचितही राग नाही, द्वेष नाही. मी काँग्रेस आहे. हे सगळे काँग्रेस आहेत. काँग्रेस या भावनेनंच देश बनवला आहे. ही भावना तुमच्याही मनात आहे. मी तुम्हाला काँग्रेस बनवेन.