नवी दिल्ली - गुजरात विधानसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी त्यांच्या पक्षाची सगळी राजकीय गणिते अगदी अचूक येत असल्याचे दिसत आहे. मात्र राहुल गांधींनी ट्विटरवर टाकलेले एक गणित मात्र चुकले आहे. आज राहुल गांधींनी महागाईच्या मुद्यावरून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी महागाईची वाढ दर्शंवणारा एक आलेख प्रकाशित केला. मात्र या आलेखातील टक्केवारीमध्ये मोठी गफलत झाल्याचे निदर्शनास आल्यावर टीका सुरू झाली. मात्र चूक लक्षात येताच राहुल गांधी यांनी हे ट्विट काढून सुधारित ट्विट अपडेट केले. या आलेखामध्ये महागाईची दाखवण्यात आलेली टक्केवारी 100 टक्क्यांहून अधिक फुगवून सांगितल्याचे निदर्शनास आले. राहुल गांधींच्या या ट्विटमध्ये महागाईची टक्केवारी फुगवून सांगितली गेली होती. हे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आल्यावर त्वरित सुधारणा करून आकडेवारी बदलून राहुल गांधींनी सुधारित ट्विट केले. दरम्यान, गुजरातमध्ये 22 वर्षांपासून असलेली भाजपाची सत्ता संकटात आहे. अँटी इन्कम्बन्सीची लाट, पटेलांची नाराजी आणि राहुल गांधी, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर यांनी उघडलेली जोरदार आघाडी यामुळे भाजापाविरोधी मतदारांचा कल काँग्रेसच्या दिशेने झुकल्याचे दिसत आहे. त्याचेच प्रतिबिंब आज जाहीर झालेल्या एबीपी न्यूज आणि सीएसडीएसच्या ओपिनियन पोलमध्ये दिसले आहे. या पोलममध्ये वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार राज्यात 22 वर्षांनंतर प्रथमच काँग्रेसच आणि भाजपात अटीतटीची लढत होण्याची चिन्हे दिसत असून. दोन्ही पक्षांना प्रत्येकी 43 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी भाजपा निसटत्या बहुमतासह सत्ता राखण्याची शक्यता असून, भाजपाला 91 ते 99 तर काँग्रेसला 78 ते 86 जागा मिळण्याचा अंदाज वर्तंवण्यात आला आहे. तर इतरांना 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी काँग्रेस मुख्यालयात पार्टी अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पार्टीतील दिग्गज नेतेमंडळीदेखील काँग्रेस मुख्यालयात उपस्थित होते. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, कर्नाटकचे सिद्धारमय्या, हिमाचल प्रदेशचे वीरभद्र सिंह, वी.नारायणस्वामी, मेघालयचे मुकुल संगमा आणि वरिष्ठ नेते ज्योतिरादित्य सिंधियादेखील हजर होते.
आणि राहुल गांधींचे गणित चुकले, चूक लक्षात येताच सुधारले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2017 9:28 PM