नवी दिल्ली : सोशल मिडीयावर आपल्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध असलेल्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या बालीला फिरायला जाणे सुरक्षित असेल का? असे विचारणाऱ्या ट्विटर युजरला दिलेल्या उत्तराने पुन्हा चर्चेत आल्या आहेत. परदेशात संकटात असणाऱ्या भारतीय नागरिकांच्या नेहमीच मदतीला तत्पर असलेल्या सुषमा स्वराज यांना एका युजरने ट्विटरवर 11 ते 17 ऑगस्ट या काळात बालीमध्ये फिरायला जाणे सुरिक्षत असेल का? सरकारने या संबंधात काही पाऊले उचलली आहेत का ? असा प्रश्न विचारला. या ट्विटमध्ये त्याने इंडोनेशिया आणि बाली येथील भारतीय दुतावासालाही टॅग केले होते. या प्रश्नावर स्वराज यांनी गमतीशीर उत्तर दिले.
सुषमा स्वराज म्हणाल्या की, यासंबंधी मला ज्वालामुखीसोबत बोलावे लागेल. स्वराज यांच्या या ट्विटला 13 हजारपेक्षाही जास्त लाईक आणि अडीच हजारावर रिट्विट करण्यात आले आहे. तर काही युजर्सनी प्रश्न विचारणाऱ्यालाच सल्ले दिले.