बंगळुरू : आठ महिन्यांच्या गर्भवती महिला उमेदवाराला दिवाणी न्यायाधीश होण्याची परीक्षा द्यायची होती, मात्र तिला बंगळुरू शहरात येणे शक्य नव्हते. त्यामुळे या महिलेला तिच्या मूळ गावी, मंगळुरूमध्येच परीक्षेला बसण्याची परवानगी कर्नाटक उच्च न्यायालयाने दिली.
कोर्टाने ५७ न्यायाधीशांच्या भरतीसाठी यावर्षी मार्चमध्ये अधिसूचना जारी केली होती. ६ हजारपेक्षा अधिक उमेदवारांतून १,०२२ उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड करण्यात आली. ही मुख्य परीक्षा बंगळुरूमध्ये शनिवार आणि रविवारी आयोजित करण्यात आली आहे.
समितीत कोण? nदिवाणी न्यायाधीशांच्या थेट भरतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्च न्यायालयाच्या समितीमध्ये न्यायमूर्ती पीएस दिनेश कुमार, न्यायमूर्ती के सोमशेखर, न्यायमूर्ती एस. सुनील दत्त यादव, न्यायमूर्ती अशोक एस. किनागी आणि न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांचा समावेश होता.nत्यांनी नेत्रावतीच्या अर्जावर सहानुभूतीपूर्वक विचार करून तिला दक्षिण कन्नड जिल्ह्यात परीक्षा देण्याची परवानगी दिली.
अर्जात काय होते? दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू येथील वकील नेत्रावती यांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली होती. गर्भवती असल्याने प्रकृती अस्वास्थ्यामुळे बंगळुरूला जाणे शक्य नसल्याने जिल्ह्यातच परीक्षा देण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती त्यांनी उच्च न्यायालयात केली होती.
केवळ एका परीक्षार्थीसाठी...सरन्यायाधीश प्रसन्ना बी. वराळे यांनी समितीच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. समिती आणि मुख्य न्यायमूर्तींच्या निर्देशानंतर, उच्च न्यायालयाच्या निबंधकांनी मंगळुरू येथील जिल्हा न्यायालयात केवळ एका परीक्षार्थीसाठी परीक्षा आयोजित करण्यासंदर्भात एका महिला न्यायिक अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.