...अन् त्यांनी 'या' कारणामुळे मृतदेहाला मिठामध्ये झाकून ठेवलं; पण सत्य काही वेगळं होतं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:59 PM2019-08-20T16:59:42+5:302019-08-20T17:02:26+5:30
सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
इंदोर - सोशल मीडियात फिरणाऱ्या व्हायरल मॅसेजचा परिणाम लोकांच्या मनावर कितपत होतं याचं अजब प्रकरण मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये घडलं आहे. तलावात बुडून मृत्यू झालेल्या दोन भावांचे मृतदेह एका सरकारी आरोग्य केंद्रात रात्रभर मिठात दाबून ठेवण्यात आलं होतं. असं केल्याने ते मृत झालेले दोघं पुन्हा जीवित होतात असा संदेश व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने मृतकाच्या कुटुंबीयांकडून हा अंधविश्वासाचा खेळ रात्रभर खेळला गेला.
मध्य प्रदेशातीलआरोग्य मंत्री तुलसीराम सिलावट यांच्या मतदारसंघातील सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रविवारी गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेले सख्खे भाऊ कमलेश(20) आणि हरीश(18) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यांना पाण्यातून बाहेर काढून सांवेर येथील सार्वजनिक आरोग्य केंद्रात आणलं गेलं. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृत युवकांच्या नातेवाईकांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मॅसेजचा हवाला देत दोन्ही मृतदेह दोन क्विंटल जाड्या मिठामध्ये रात्रभर सार्वजनिक आरोग्य केंद्रात ठेवलं. या मॅसेजमध्ये अशी अफवा पसरविण्यात आली होती की, कोणत्याही व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला असेल तर त्याच्या शरीराला जाड्या मिठाने झाकून ठेवा. असं केल्यास तो मृत झालेला व्यक्ती पुन्हा जिवंत होईल. मात्र चंद्रावती पोलिसांनी सांगितल्यानुसार सोमवारी या युवकांचे मृतदेह पोस्टमॉर्टम करुन अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सुपूर्द केले. त्यांचे अंत्यसंस्कार झाले आहेत.
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या दोन्ही मृतदेहांचे फोटोनंतर सार्वजनिक आरोग्य विभागावर प्रश्न उभे राहत आहेत. या घटनेवर आरोग्य अधिकारी प्रविण जडिया यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मला मिळाली आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांच्या दबावामुळे डॉक्टरांना ही अंधश्रद्धेची घटना रोखता आली नाही. मात्र या घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करु असं त्यांनी सांगितले आहे. मात्र समाजात घडणाऱ्या अशा घटनांमुळे अंधविश्वासाला खतपाणी दिलं जात आहे. सोशल मीडियातील व्हायरल मॅसेजवर लोकांनी कितपत विश्वास ठेवावा याची जनजागरुकता लोकांमध्ये होणं गरजेचे आहे.