ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 6 - एका महिलेनं चालत्या कारमध्ये आपल्या पतीवर तीन गोळ्या झाडून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र या हल्ल्यातून स्वतःची कशीबशी सुटका करत तो गाडीतून बाहेर आला. यानंतर तो बीएमटीसीच्या बसमध्ये चढला. पण इथेही महिलेने त्याचा पाठलाग करत बस गाठलीच व बसमध्येही त्याच्यावर हल्ला केला.
यावेळी बसमधील प्रवाशांनी मध्यस्थी करत महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती एक खासगी सिक्युरिटी फर्म चालवतो. व महिलेनं त्याच्यावर हल्ला करण्यासाठी वापरलेली पिस्तुल ही परवानाधारक असल्याचे पोलिसांनी सांगितेल. शुक्रवारी अंदाजे संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
दरम्यान, पीडित व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पत्नीनं केलेल्या हल्ल्यात त्याच्या पोटाला गोळ्या लागल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले आहे. तपासणीदरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, दोघांचे लग्न जवळपास 20 वर्षापूर्वी झाले आहे. दोघंही आपल्या गाडीतून तामिळनाडूतील होसूरहून परतत होते. यावेळी एक रेस्टॉरंटमध्ये दोघांनी मद्यप्राशन केले.
पोलीस अधिका-याच्या माहितीनुसार, या पती-पत्नीमध्ये काही कारणास्तव खटके उडत होते. या दोघांमध्ये वाद सुरू असताना पतीनं हात उगारल्याने आरोपी पत्नीनं रागाच्या भरात त्याच्यावर पिस्तुल ताणली आणि लागोपाठ तीन गोळ्या त्याच्या अंगावर झाडल्या.