...आणि दोन खाणकामगार रातोरात झाले करोडपती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 12:56 PM2018-12-31T12:56:44+5:302018-12-31T13:01:17+5:30
खुदा देता है तो छप्पर फाड़ के, अशी म्हण आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांच्या जीवनात ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे.
भोपाळ - खुदा देता है तो छप्पर फाड़ के, अशी म्हण आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात असलेल्या खाणीत काम करणाऱ्या दोन मजुरांच्या जीवनात ही म्हण प्रत्यक्षात उतरली आहे. खाणीत काम करत असताना त्यांच्या हाती एक मौल्यवान हिरा लागला. त्यामुळे ते रातोरात करोडपती झाले.
त्याचे झाले असे की पन्ना येथील हिऱ्याच्या खाणीत काम करणाऱ्या मोतीलाल आणि रघुवीर या दोन मजुरांना दोन महिन्यांपूर्वी एक मोठा हिरा सापडला होता. त्या हिऱ्याचा नुकताच लिलाव करण्यात आला. त्याचा मोबदला म्हणून या कामगारांना 2.55 कोटी रुपये मिळाले. लिलाव झालेला हिरा 42.9 कॅरेटचा असल्याचे सांगण्यात येत आहे. हा हिरा खरेदी करण्यासाठी अनेक कोट्यधीशांनी बोली लावली होती. आता हिरा विकून मिळालेल्या रकमेतून हे दोघेही आपल्या कर्जाची परतफेड करणार आहेत. तसेच मुलांना चांगले शिक्षण देणार आहेत.
शुक्रवारी या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी हा हिरा खरेदी करण्यासाठी अनेक जवाहीर तिथे पोहोचले होते. दरम्यान, सुमारे 2.55 कोटी रुपयांची बोली लावत झाशी येथील ज्वेलर राहुल जैन आणि बीएसपीचे नेते चरण सिंह यांनी हा हिरा खरेदी केला. लिलिलावावेळी त्यांनी 6 लाख रुपये प्रति कॅरेटच्या दराने बोली लावली होती.
याबाबत पन्ना येथील हिरा अधिकारी संतोष सिंह यांनी सांगितले की, मोतीलाल आणि रघुवीर प्रजापती यांना सापडलेल्या हिऱ्याचा लिलाव करण्यात आला असून, त्याबदल्यात त्यांना 2.55 कोटी रुपये देण्यात येतील. सध्या लावण्यात आलेल्या बोलीपैकी 20 टक्के रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम हिरा मिळाल्यानंतर जमा करण्यात येणार आहे.
दरम्यान, पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीमध्ये याआधीडी 42.9 कॅरेटचा हिरा सापडला होता. 1961 मध्ये पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीत 44.55 कॅरेटचा हिरा सापडला होता.