हैदराबाद- आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी एका 13 वर्षीय मुलाने 23 वर्षाच्या तरुणीशी लग्न केल्याची घटना आंध्र प्रदेशातील कुरनूल जिल्हात असणाऱ्या उप्परहाल गावात घडली आहे. गेल्या महिन्यातील हा प्रकार असून यासंदर्भातील माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. हिंदूस्तान टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
आंध्र प्रदेशात राहणाऱ्या या 13 वर्षीय मुलाची आई गंभीर आजारी होती. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर जबाबदारी सांभाळणारी कुणीतरी मोठी व्यक्ती घरात असावी, यासाठी मुलाचा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीशी विवाह व्हावा, अशी त्यांची इच्छा होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
13 वर्षीय मुलगा व 23 वर्षीय मुलीचा विवाहसोहळा 27 एप्रिल रोजी मुलाच्या घरी पार पडला. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट झाल्यानंतर लग्नाबद्दलची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली. 23 वर्षीय मुलगी ही कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील छानिकानूर गावातील आहे. लग्न समारंभा पार पडल्यानंतर दोन्हीही कुटुंब फरार आहेत. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर तपास करण्यासाठी जिल्हा महिला विकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सरकारी पथक, बालकल्याण अधिकारी शारदा, स्थानिक तहसीलदार श्रीनिवास राव यांनी मुलाच्या घरी गेले होते पण तेथे घराला कुलूप असल्याचं त्यांना आढळून आलं.
स्थानिकांच्या माहितीनुसार, मुलाची आजारी आई व वडील शेतमजूर होते. मुलाच्या वडिलांना दारूचं व्यसन असल्याने मृत्यूनंतर घराकडे कोण लक्ष देणार ? याची चिंता मुलाच्या आईला होती. त्यामुळे घरात कुणीतरी मोठी व्यक्ती असावी, असं त्याचं मत होतं म्हणून त्यांनी मुलाचं त्याच्या वयापेक्षा मोठ्या मुलीशी लग्न लावून दिली. या महिलेला दोन मुलं व दोन मुली आहेत .
दरम्यान, कायद्यानुसार हा विवाह वैध नसून रद्द ठरविण्यात आला आहे. मुलगा व त्या मुलीला दोन दिवसात जिल्हाअधिकाऱ्यांसमोर हजर केलं नाही तर कुटुंबांविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असं तहसीलदार श्रीनिवास राव यांनी म्हटलं.