निवडणूक प्रचारादरम्यान झालेल्या दगडफेकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी जखमी झाले आहेत. ते विजयवाड्यात प्रचार करत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. दगडफेकीत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जखमी झाले आहेत. त्यांच्या डोळ्याजवळ जखम झाली आहे. वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी बसमध्ये प्रचार करत होते. यावेळी दगडफेक झाली, दगड मुख्यमंत्र्यांच्या डाव्या भुवयाच्या वरती दगड आदळल्याने जखम झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची जिथून रॅली सुरू होती, तेथील शाळेतून दगडफेक करण्यात आली. पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की, "हा हल्ला टीडीपी आघाडीचा कट आहे. चंद्राबाबू नायडू यांची अस्वस्थता दिसून येते.", असा आरोपही केला आहे.
"मुख्यमंत्री विजयवाडा येथील सिंह नगर येथील विवेकानंद स्कूल सेंटरमध्ये जमावाला संबोधित करत असताना दगडफेक झाली," असे मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. अत्यंत वेगाने दगड रेड्डी यांच्यावर आदळला. तो गोफणीतून सोडण्यात आला असावा, असा अधिकाऱ्यांचा संशय आहे.
सीएम जगन रेड्डी मार्चमध्ये त्यांच्या पक्षाच्या निवडणूक प्रचाराचा भाग म्हणून मेमंथा सिद्धम बस प्रवास सुरू केला होता. २१ दिवसांच्या बस प्रवासाचे उद्दिष्ट सर्व जिल्ह्यांना कव्हर करण्याचे आहे. राज्यात लोकसभेसोबतच विधानसभेच्याही निवडणुका या वर्षी होणार आहेत. भाजपने तेलगू देसम आणि जनसेना पक्षासोबत युती केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे, ट्विटमध्ये, 'मी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना लवकर बरे होण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो', असं म्हटले आहे.