आमचं सरकार भ्रष्ट शासन देणार; उपमुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 12:14 PM2019-06-16T12:14:46+5:302019-06-16T12:15:38+5:30
यावर विरोधीपक्ष असलेल्या टीडीपीने पुष्पा यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री पुष्पा यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत असल्याचे टीडीपीने म्हटले आहे.
अमरावती - नुकत्याच आंध्रप्रदेशच्या उपमुख्यमंत्री पदी विराजमान झालेल्या पी. पुष्पा श्रीवानी यांची जीभ घसरली आहे. पुष्पा शनिवारी म्हणाल्या की, आमच्या सरकारचे लक्ष्य आहे की, आंध्रप्रदेशात भ्रष्ट सरकार द्यायचे. येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.
पुष्पा म्हणाल्या की, आमच्या सरकारचे लक्ष्यच राज्यात भ्रष्ट शासन देण्याचे आहे. वास्तविक पाहता पुष्पा यांना भ्रष्टाचार मुक्त शासन म्हणायचे होते. मात्र त्यांच्याकडून भ्रष्टाचारी शासन म्हटले गेले. पुष्पा या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या मतदार संघात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावर विरोधीपक्ष असलेल्या टीडीपीने पुष्पा यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री पुष्पा यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत असल्याचे टीडीपीने म्हटले आहे. टीडीपीने आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले की, आगामी काळातील आपल्या लक्ष्यविषयी माहिती दिल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांचे आभार. आम्ही आपल्या वक्तव्याशी सहमत आहोत.
देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आंध्रप्रदेशमध्ये सत्तेवर आलेल्या जगन मोहन रेड्डी यांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नियुक्त केलेल्या पाच उपमुख्यमंत्र्यांमध्ये पुष्पा यांचा समावेश आहे.