विशाखापट्टणम: आंध्र प्रदेशच्या केमिकल कारखान्यातून वायू गळती झाल्यानं तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. विशाखापट्टणममध्ये असलेल्या आर. एस. व्यंकटपुरम गावातल्या एलजी पॉलिमर उद्योग कारखान्यातून वायू गळती झाली. मध्यरात्री ३ च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे २०० जणांची प्रकृती बिघडली आहे. वायू गळती होताच संपूर्ण परिसर रिकामा करण्यात आला.एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, केमिकल कारखान्यातून वायू गळती सुरू होताच परिसरात राहणाऱ्या लोकांच्या डोळ्यांत जळजळ होऊ लागली. अनेकांना श्वास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असलेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. केमिकल कारखान्यातून पसरलेल्या वायूचा परिणाम ३ किलोमीटरच्या परिसरात जाणवत असल्याची माहिती पश्चिम विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त स्वरुपा रानी यांनी दिली. वायू गळतीची माहिती मिळताच अनेक जण केमिकल कारखान्याच्या परिसरात पोहोचले. विषारी वायूमुळे त्यांना डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली. विषारी वायूची तीव्रता अतिशय जास्त असल्यानं आसपास राहणारे काही जण घरातच बेशुद्ध पडले. यामध्ये लहान मुलांची आणि वृद्धांची संख्या जास्त असल्याची माहिती स्वरुपा राणी यांनी दिली.