हैदराबाद - बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसनंआंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. आंध्र प्रदेशकाँग्रेस अध्यक्षा वाय.एस शर्मिला रेड्डी यांनी गुरुवारी चलो सचिवालय नारा दिला आहे. या मोर्चाआधी हाऊस अरेस्टपासून वाचण्यासाठी वाय.एस शर्मिला यांनी संपूर्ण रात्र काँग्रेस पक्ष कार्यालयात घालवली. विरोधी मोर्चापूर्वी वायएस शर्मिला रेड्डी यांना नजरकैदेत ठेवण्याची भीती वाटत होती. त्यामुळे त्यांनी ही खबरदारी घेतली.
शर्मिला रेड्डी यांनी राज्यातील युवकांना बेरोजगारीपासून मुक्त करा अशी मागणी केली आहे. मागील ५ वर्षापासून युवक, बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरले आहे. जर आम्ही बेरोजगार युवकांच्या बाजूने सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असू तर तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवणार का? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
तसेच आम्हाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार नाही का? एक महिला असून घरात नजरकैदेतून सुटका व्हावी यासाठी मला पोलिसांपासून वाचण्यासाठी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयात घालवावी लागते हे लाजिरवाणे नाही का? आम्ही दहशतवादी आहोत का? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सांगत वाय.एस शर्मिला रेड्डी यांनी मुख्यमंत्री भावावर निशाणा साधला.
दरम्यान, राज्य सरकार आम्हाला घाबरतंय. ते स्वत:चे अपयश आणि राज्यातील वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. भले ही ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असतील, आमच्या कार्यकर्त्यांना थांबवाल, बॅरिकेड्स लावून त्यांना अडवाल परंतु बेरोजगारीच्या समस्येबाबत आमचा संघर्ष थांबणार नाही असा इशाराही वाय एस शर्मिला रेड्डी यांनी दिला आहे.