नवी दिल्ली - आंध्र प्रदेशात आता तीन राजधान्या असणार आहेत. सोमवारी (20 जानेवारी) विधानसभेत तीन राजधान्यांचे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. याआधी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर हे विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं. आंध्र प्रदेशातील राजधान्यांमध्ये कुरनूल, विशाखापट्टनम आणि अमरावतीचा समावेश आहे. त्यामुळे आता विधेयकानुसार विशाखापट्टनम ही प्रशासकीय कार्यकारी राजधानी, अमरावती विधिमंडळ तर कुरनूल ही आंध्र प्रदेशची न्यायिक राजधानी असेल.
मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी याआधी विधानसभेत आंध्र प्रदेश राज्याच्या तीन राजधान्या असतील हे सांगितले होते. या वेगवेगळ्या राजधान्यामधून सरकार, विधानसभा आणि न्याय प्रक्रियेचे कामकाज केले जाणार आहे. म्हणजेच विशाखापट्टनम् आंध्रप्रदेशची प्रशासकीय कार्यकारी (executive) राजधानी असणार आहे. कुरनूलला न्यायिक (judicial) राजधानी म्हणून ओळख मिळणार आहे. तर, अमरावती विधिमंडळ (lagislative ) राजधानी म्हणून ओळखली जाणार आहे.
विधानसभेत या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. गोंधळ घालणाऱ्या आमदारांवर कारवाई करत अध्यक्षांनी त्यांना दिवसभरासाठी निलंबित केलं होतं. आमदारांवर केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी विधानसभेबाहेर पायऱ्यांवर आंदोलन केलं. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यापूर्वीही त्यांनी तीन राजधान्यांच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध केला होता. आज आंध्र प्रदेशच्या इतिहासातील काळा दिवस आहे. जगातील कोणत्याही देशांमधील राज्यांना तीन राजधान्या नाहीत. आम्ही अमरावती आणि आंध्र प्रदेशला वाचवू इच्छितो असं चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे.
आंध्र प्रदेशमध्ये सत्तांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्यातील गरीब मुलांच्या शिक्षणासाठी 'जगनन्ना वसति दीवेना योजना' सुरू केली आहे. या योजनेसाठी चालू आर्थिक वर्षात तब्बल 2300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वायएसआर सरकारने नुकतेच एक सर्वेक्षण केले होते, त्यानुसार 95,887 नवीन विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत. दहावी आणि पुढील शिक्षणासाठी गरीब विद्यार्थ्यांना या जगनन्ना वसति दीवेना योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेंतर्गत गरीब विद्यार्थ्यांना वर्षाला 20 हजार रुपयांची मदत सरकारकडून दिली जाणार आहे. ही पूर्ण रक्कम विद्यार्थ्याच्या आईच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. आत्तापर्यंत या योजनेसाठी 10,65, 357 विद्यार्थी पात्र होते, पण 95,887 विद्यार्थ्यांची आणखी भर यात पडली आहे. त्यामुळे, 'जगनन्ना वसति दीवेना योजनेसाठी' 11,61,224 विद्यार्थी पात्र असणार आहेत. लवकरच सरकारकडून या विद्यार्थ्यांना जगनन्ना वसति दीवेना योजनेचं कार्ड देण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या
सूरतमधील रघुवीर मार्केटमध्ये भीषण आग
Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली
शासकीय दस्तऐवजातही पाथरीच साईबाबांची जन्मभूमी असल्याची नोंद
‘सीएए’ अंमलबजावणीवरून काँग्रेसमध्ये मतभेद?
अभिमानस्पद! ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांच्या लेकींचा रोबोट जाणार अमेरिकेला
रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; ३० जानेवारीपर्यंत कोयना एक्सप्रेससह अन्य ६ गाड्या रद्द