आंध्र प्रदेशात भारतीय जनता पक्ष (BJP) आणि जन सेना पार्टी यांच्यासोबोत युती करून विधानसभा निवडणूक लढलेल्या आणि विजयी झालेल्या चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने (TDP) मुस्लीम आरक्षणासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. "आंध्र प्रदेशातमुस्लीम समाजाला दिले जाणारे आरक्षण पुढेही सुरूच राहील", असे टीडीपी नेते आर. रवींद्र कुमार यांनी शुक्रवारी म्हटले आहे.
एएनआय सोबत बोलताना आर. रवींद्र कुमार म्हणाले, "हो, आम्ही आंध्र प्रदेशातील मुस्लीम आरक्षण सुरूच ठेऊ. यात कसलीही समस्या नाही." महत्वाचे म्हणजे, रवींद्र कुमार यांचे हे विधान, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या आश्वासनाच्या एक महिनानंतर आले आहे. गेल्या एक महिन्यापूर्वी, "भलेही आपला सहकारी पक्ष असलेल्या भाजपने धर्माच्या आधारावर आरक्षण न देण्याचा दावा केलेला असो, मात्र आपला पक्ष आंध्र प्रदेशात मुस्लीम आरक्षण सुरूच ठेवेल, असे चंद्राबाबू नायडू यांनी म्हटले होते.
काय म्हणाले होते चंद्रबाबू? -गेल्या 5 मे 2024 रोजी पत्रकारांसोबत बोलतान चंद्राबाबू म्हणाले होते, "आम्ही सुरुवातीपासूनच मुस्लीम समाजासाठी चार टक्के आरक्षणाचे समर्थन करत आहोत आणि हे सुरूच राहील." नायडू यांच्या या विधानापूर्वी, आपण दलीत, आदिवासी आणि ओबीसींचा कोटा मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर देऊ देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
आंध्र प्रदेशात एनडीएला प्रचंड बहुमत -चंद्रबाबू नायडू यांची टीडीपी एनडीएचा भाग आहे. एनडीएने आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआरसीपीचा पराभव केला आहे. अभिनेत्याचे नेते झालेले पवन कल्याण यांची जन सेना देखील एनडीएचा भाग आहे. एनडीएने आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत 175 पैकी 164 जागांवर विजय मिळवत प्रचंड बहुमत मिळवले आहे. यात टीडीपीने 135, जनसेनेने 21 तर भाजपने 8 जागांवर विजय मिळवला आहे.