Andhra Pradesh Assembly elections (Marathi News) देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत सध्या जोरदार चर्चा सुरु आहेत. या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत आंध्र प्रदेशातही विधानसभा निवडणुकीचा जल्लोष सुरू आहे. निवडणूक आयोगाने अद्याप निवडणुकांच्या तारखा निश्चित केल्या नाहीत, तरीही या निवडणुका मे महिन्यात होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, राज्यातील राजकीय पक्षांनी या निवडणुकांसाठी पूर्ण तयारी केली असून, विधानसभा जागांसाठी उमेदवारही निश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) आणि जनसेना पार्टीने उमेदवारांची यादी जाहीर केल्याचे समोर आले आहे. या यादीत सुशिक्षित वर्गातील उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टीडीपी-जनसेना युतीने शनिवारी आंध्र प्रदेश निवडणूक 2024 साठी 118 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि जनसेना अध्यक्ष पवन कल्याण यांनी संयुक्तपणे उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
टीडीपी आगामी विधानसभा निवडणुकीत 151 जागांवर लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्राबाबू नायडू हे कुप्पममधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान, आज जाहीर केलेल्या 118 उमेदवारांच्या या यादीत, टीडीपी 94 जागांवार आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहे. तर जनसेना 24 जागांवर निवडणूक लढवणार आहे, यासंदर्भात लवकरच घोषणा केली जाईल. टीडीपीच्या यादीत 94 पैकी 23 नवीन चेहरे आहेत. या यादीमध्ये पदव्युत्तर पदवी असलेले 28 उमेदवार, पदवीधर असलेले 50 उमेदवार, 3 डॉक्टर, 2 पीएचडी आणि 1 आयएएस अधिकारी यांचा समावेश आहे.
दरम्यान, 24 जागांपैकी जनसेना पार्टीने 5 जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये नेल्लीमारला मतदारसंघातून लोकम माधवी, अनकापल्ली मतदारसंघातून कोनाथला रामकृष्ण, राजनगरम मतदारसंघातून बट्टुला बलरामकृष्ण, काकिंदा ग्रामीण मतदारसंघातून पंथम नानाजी आणि तेनाली मतदारसंघातून नाडेंडला मनोहर यांना उमेदवारी दिली आहे.