नवी दिल्ली - आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आक्रमक पवित्रा स्वीकारला आहे. आपल्या मागणीसाठी चंद्राबाबू नायडूंनी राजधानी नवी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणास सुरुवात केली आहे. मात्र, त्यांच्या उपोषणादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. आंध्र भवनाबाहेर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणारी व्यक्ती आंध्र प्रदेशमधीलच रहिवासी आहे. या व्यक्तीच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटदेखील सापडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, चंद्राबाबू नायडू मोदी सरकारविरोधात एकदिवसीय उपोषणावर बसले आहेत. मोदी सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी चंद्राबाबूंनी लावून धरली आहे. रविवारी (10 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आंध्र प्रदेशातील रॅली झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली.
'जर तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर त्या कशा पूर्ण करायच्या आम्हाला चांगलेच माहीत आहे. हा आंध्र प्रदेशातील लोकांच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. जेव्हा कधी आमच्या स्वाभिमानावर हल्ला होईल, आम्ही सहन करणार नाही. मी सरकारला आणि खासकरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना चेतावणी देत आहे की एकट्यावर हल्ला करणे थांबवा', असा शब्दांत चंद्राबाबू नायडूंनी इशारा दिला आहे.
दुसरीकडे, चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला काँग्रेसनं पाठिंबा दर्शवला आहे.