तिरुपती :आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावरील भगवान व्यंकटेश्वराच्या मंदिरातील लाडू प्रसादाची गुणवत्ता सुधारली असून तिरुपतीला भेट देणारे भाविकदेखील समाधानी असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी केला. व्यंकटेश्वर स्वामी मंदिराचे विश्वस्त मंडळ तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) च्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. लाडवाच्या गुणवत्तेवरून निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री नायडू यांनी प्रथमच लाडूच्या गुणवत्तेबद्दल वक्तव्य केले.
मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मंदिरातील प्रसाद बनवताना केवळ उत्तम दर्जाच्या पदार्थांचा वापर व्हावा याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी टीटीडीच्या अधिकाऱ्यांना दिले. तिरुमला येथील व्हीआयपी संस्कृती कमी झाली पाहिजे. प्रसिद्ध व्यक्तींनी किंवा सेलिब्रिटींनी मंदिरात जाताना कोणतीही गडबड करू नये, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. तिरुमला मंदिरात “गोविंदा नमम” शिवाय इतर दुसरा कोणताही शब्द ऐकायला येऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.