CM Chandrababu Naidu on Railway Bridge : आंध्र प्रदेशात पुरामुळे हाहाकार उडाला आहे. मुसळधार पावसानंतर आंध्र प्रदेशातील अनेक ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत. या पुरामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे पूरसदृश्य परिस्थिती पाहणी करण्यासाठी बाहेर पडले आहेत. पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू एका मोठ्या दुर्घटनेतून थोडक्यात बचावले. पाहणी करत असतानाच नायडू यांच्या जवळून रेल्वे गेली. मात्र सुदैवाने यामध्ये मुख्यमंत्री नायडू यांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आंध्र प्रदेशात मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरामुळे प्रचंड हाहाकार उडाला. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू नुकसानग्रस्त भागांना भेट देत आहेत. पुराच्या पाण्यात चालण्यापासून ते बोट आणि बुलडोझरवर विविध मार्गांनी मुख्यमंत्री नायडू पूरग्रस्त लोकांना पर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रयत्नादरम्यान, मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. पुराच्या पाण्याने वाहणाऱ्या नाल्याची पाहणी करत असताना त्यांच्या जवळून वेगात एक ट्रेन गेली. मुख्यमंत्री नायडू यांच्यासह अनेक अधिकारी आणि एनएसजी कमांडो विजयवाड्यातील एका छोट्या रेल्वे पुलावर पाण्याच्या प्रवाहाची तपासणी करत होते. यावेळी एक धावती ट्रेन त्यांच्या जवळून गेली. ही गाडी मुख्यमंत्री नायडू यांच्या अगदी जवळून गेली. कार्यकर्त्यांनी नायडू यांना मागे खेचून धरलं. त्यामुळे मुख्यमंत्री नायडू हे थोडक्यात बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेमध्ये मोठी त्रुटी यावेळी समोर आली आहे.
दरम्यान, गेल्या ५ दिवसांपासून पूरग्रस्त भागाचा दौरा करणारे नायडू अनेकदा सुरक्षा नियम तोडताना दिसले आहेत. यादरम्यान ते गुडघाभर पाण्यात चालताना आणि एनडीआरएफच्या बोटींवर चढताना दिसले आहेत.