APCC chief YS Sharmila Reddy detained by police in Vijayawada (Marathi News) आंध्र प्रदेशात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशकाँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी आपला भाऊ वायएसआरसीपी नेते आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. याआधी वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारवर आरोप केला होता की, त्यांना नजरकैदेत ठेवले जाऊ शकते. नजरकैदेच्या भीतीने शर्मिला रेड्डी यांनी संपूर्ण रात्र काँग्रेस कार्यालयात काढली. दरम्यान, आता वायएस शर्मिला रेड्डी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशच्या जगमोहन रेड्डी सरकारविरोधात मोर्चा उघडला आहे. आंध्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वायएस शर्मिला रेड्डी यांनी गुरुवारी चलो सचिवालय नारा दिला आहे. यादरम्यान, वायएस शर्मिला रेड्डी आपल्या कार्यकर्त्यांसह सचिवालयाच्या दिशेने जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी आम्ही बेरोजगार युवकांच्या बाजूने सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तुम्ही आम्हाला नजरकैदेत ठेवणार का? असा सवाल वायएस शर्मिला रेड्डी यांनी सरकारला केला होता.
याचबरोबर, आम्हाला लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा अधिकार नाही का? एक महिला असून घरात नजरकैदेतून सुटका व्हावी, यासाठी मला पोलिसांपासून वाचण्यासाठी संपूर्ण रात्र पक्षाच्या कार्यालयात घालवावी, लागते हे लाजिरवाणे नाही का? आम्ही दहशतवादी आहोत का? आम्हाला रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगत वायएस शर्मिला रेड्डी यांनी मुख्यमंत्री भावावर हल्लाबोल केला होता.
वायएस शर्मिला रेड्डी यांनी विजयवाडा येथील आंध्ररत्न भवन (काँग्रेस कार्यालय) येथे पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, जगन मोहन रेड्डी गेल्या पाच वर्षांत तरुण, बेरोजगार आणि विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. याचबरोबर, राज्य सरकार आम्हाला घाबरतंय. ते स्वत:चे अपयश आणि राज्यातील वास्तव लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. भले ही ते आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करत असतील, आमच्या कार्यकर्त्यांना थांबवाल, बॅरिकेड्स लावून त्यांना अडवाल परंतु बेरोजगारीच्या समस्येबाबत आमचा संघर्ष थांबणार नाही, असा इशाराही शर्मिला रेड्डी यांनी दिला होता.