नवी दिल्ली - देशाच्या इतिहासात प्रथमच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंत्र्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी यांनी आंध्रप्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून दलित महिला आमदार मेखाथोटी सुचरिता यांच्याकडे गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपविली आहे.
गुंटूर जिल्ह्यातील प्रतिपादू या राखीव मतदार संघातील आमदार मेखातोटी सुचरिता या राज्याच्या नवीन गृहमंत्री असणार आहे. शनिवारी मेखाथोटी सुचरिता यांना २४ इतर अमदारांसह अमरावती येथील राज्य सचिवालयात आयोजित कार्यक्रमात मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. तेलंगना राज्य वेगळे झाल्यानंतर सुचरिता या आंध्रप्रदेशच्या पहिल्या महिला गृहमंत्री ठरल्या आहेत.
जगनमोहन रेड्डी यांचे पिता वाय.एस. राजशेखर रेड्डी यांनी देखील त्यांच्या मंत्रीमंडळात महिलेला गृहमंत्रीपद दिले होते. त्यावेळी त्यांनी पी. सबिता इंद्रा रेड्डी यांना गृहमंत्री केले होते. सबिता इंद्रा रेड्डी आता टीआरएसच्या आमदार आहेत.
जगमोहन रेड्डी यांनी आपल्या मंत्रीमंडळात पाच उपमुख्यमंत्री नियुक्त केले आहे. शनिवारी २५ कॅबिनेट मंत्र्यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राज्यातील सर्वच घटकांना मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळेल या उद्देशाने आपण पाच उपमुख्यमंत्री नियुक्त केल्याचे जगनमोहन रेड्डी यांनी सांगितले.