आंध्र प्रदेशमध्ये पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं असून लोकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चित्तूर जिल्ह्यात जोरदार पाऊस असतानाच एका कुटुंबातील व्यक्तीचं निधन झालं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी लोकांना कंबरभर पाण्यातून जावं लागल्याची घटना समोर आली आहे.
पाण्यातून जात असलेल्या या लोकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. चित्तूरच्या कस्तुरी नायडू कांड्रिगा येथे राहणारे शंकर (५३) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. याच दरम्यान राज्यात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. अशा परिस्थितीत अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबाला कंबरभर पाण्यातून स्मशानभूमी गाठावी लागली.
अतिवृष्टीनंतर भविष्यात अशा समस्या टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पूल बांधण्याची मागणी केली आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम आणि लगतच्या दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर दाबाचे क्षेत्र स्पष्टपणे तयार होत आहे. IMD ने मंगळवारी आंध्र प्रदेश आणि यनममध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आंध्र प्रदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितलं की, गुरुवारी पश्चिम गोदावरी, एलुरु, कृष्णा आणि एनटीआर जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता आहे. IMD ने गुंटूर, बापटला, पलानाडू, प्रकाशम, नेल्लोर, नंदयाला, अन्नमय्या, चित्तूर, तिरुपती आणि कुरनूल जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे.