आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) कडप्पा जिल्ह्यात (Kadapa District Floods) शुक्रवारी अचानक आलेल्या पुरात (Floods) आतापर्यंत किमान 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता झाल्याचे समजते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ते आणि रहिवासी भागांत पाणीच पाणी दिसत आहे. दरम्यान, आंध्र प्रदेशातून समोर आलेल्या एका व्हिडिओत विध्वंसाचे दृश्य समजू शकते. या व्हिडिओत एक घर काही सेकंदात अक्षरशः पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसल्याचे दिसते.
हा व्हिडिओ आंध्र प्रदेशातील तिरुचनूरचा असल्याचे बोलले जाते. या व्हिडिओत पुरानंतर नदीचा तडाखा कसा असतो, ते स्पष्टपणे दिसत आहे. पाण्याच्या वेगवान तडाख्यात घर कसे अचानक कोसळते हेही या व्हिडिओत दिसत आहे. सध्या या घटनेसंदर्भात फारशी माहिती मिळालेली नाही. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त शेअर होत आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, चेरू या छोट्या नदीला अचानक आलेल्या पुरामुळे काठावरील काही गावांत पाणी घुसले. नंदालुरूजवळ तीन मृतदेह आढळून आले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे, यामुळे चित्तूर आणि कडपाह येथे अनेक वर्षांनंतर भीषण पूर आला आहे.