ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. 6- आंध्रप्रदेशात चार दिवसामध्ये विक्रमी मद्यविक्री झाल्याची नोंद झाली आहे. चार दिवसात आंध्रप्रदेशात 200 कोटींची दारू विकली गेली आहे. तेथिल 70 टक्के दारूची दुकानं परवान्यांचं नुतनीकरण न झाल्याने बंद असूनही इतकी दारू विकली गेली आहे. शहरांतून जाणारे रस्ते हे महामार्ग या व्याख्येतून वगळता येतील, असं सुप्रीम कोर्टाने मंगळवारी स्पष्ट केल्यानंतर तेथिल दारूची दुकानं सुरू झाली होती. तसंच शहरामध्ये दारूची दूकानं बंद असावी या मागणीसाठी तेथिल महिलांनी आंदोलनही केलं होतं पण त्या आंदोलनाचा कुठलाही परिणाम दारू विक्रीवर झाला नसल्याचं चित्र दिसतं आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मंगळवारी आंध्रप्रदेशातील दारूची दुकानं सुरू झाली. चार दिवसात झालेली दारू विक्री पाहून आम्हीही गोंधळलेलो आहे, अशी प्रतिक्रीया उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 200 कोटी रूपयांची दारू विक्री तेथे जास्त प्रमाणात असलेल्या दारूच्या अनधिकृत दुकानांमुळे झाली आहे, असं उत्पादन शुल्क विभागातील काही कर्मचाऱ्यांनी नमूद केलं.
आणखी वाचा
शहरांतील महामार्गांवर दारू मिळणार? सुप्रिम कोर्टानेच दाखवला "मार्ग’
भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा
बनावट जात प्रमाणपत्रामुळे येणार नोकरीवर कु-हाड
4 जुलै रोजी एपी ब्रेवेरीज कॉर्पोरेशन या कंपनीने 58.82 कोटी रूपयांचा माल बाजारात आणला होता. तसंच अनधिकृत दारूची दुकानं असल्याने जास्त विक्री झाली. याचा अर्थ सरकारकडून दारूविक्रीला प्रोत्साहन दिलं जातं आहे, असं एआयडीडब्लुएचे स्टेट जनरल सेक्रेटरी डी रामदेवी यांनी तक्रारीत म्हंटलं आहे.
अधिकृत रेकॉर्डनुसार उत्पादन शुल्क विभागाने हायवेवरील दूकानं बंद असल्याचं गृहीत धरून जून महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसात मद्य पुरवठा केला नव्हता. तसंच परवानाधारक दारू विक्रेत्यांना त्यांच्याकडील माल संपवून 1 जुलैपर्यत नवीन परवाना मिळविण्यासाठी तसंच पर्यायी स्थळांसाठी प्रस्ताव तयार करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 1 जुलैपासून राज्यातील 10 ते 15 टक्के दुकानं नवे परवाने मिळाल्यानंतर सुरू झाली. या दुकानदारांनी पहिल्या दिवशी म्हणजेच 1 जुलै रोजी 18 कोटींचा स्टॉक विकत घेतला. 2 जुलै रोजी 56.97 कोटी तर 3 जुलै रोजी एकूण 75.01 कोटींचा स्टॉक विकत घेतला होता.