Andhra Pradesh Children Electrocuted :आंध्र प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विजेचा धक्का बसल्याने एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन चिमुकली मुले सायकल चालवत असताना विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने हा सगळा धक्कादायक प्रकार घडला. मुलांच्या मृत्यूच्या घटनेने कुटुंबियांना धक्का बसला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे.
आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यात एका शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन्ही शाळकरी मुले सायकलवरून जात असताना त्यामध्ये विजेची तार अडकली. काही वेळातच त्यांच्या सायकलला आग लागली आणि दोघेही खाली पडले. या दोघांपैकी एकाने बराच वेळ तार गुंडाळून ठेवल्याने त्याचा वेदनादायक मृत्यू झाला. दुसरा मुलगाही सायकलच्या जवळ होता. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही धक्कादायक घटना कुड्डापाह जिल्ह्यातील बेलामोंडी भागात घडली. घटनेच्या ठिकाणापासून जवळच आंतरराष्ट्रीय कल्याण मंडपम देखील आहे. तनवीर आणि ॲडम अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. दोन्ही मुले सायकलवरुन पडताच लोक मदतीसाठी धावत आले. लोकांनी कशीतरी विजेची तार काढून दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, विजेचा धक्का बसलेल्या मुलांपैकी एक दहावीत शिकत होता तर दुसरा आठवीचा विद्यार्थी होता. विजेचा धक्का इतका जबरदस्त होता क्षणात सायकलने पेट घेतला.
दरम्यान, या घटनेनंतर रस्त्यावर उघड्या विजेच्या तारा कशा पडल्या आहेत, असा सवाल लोक विचारत आहेत. या प्रकरणामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. भारतात माणसाच्या जीवनाचे मूल्य खूपच कमी झाल्याचे लोक सोशल मीडियावर म्हणत आहेत. दुसरीकडे, दिल्लीतही असाच एक प्रकार उघडकीस आला होता. मुसळधार पावसात विजेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. दिल्लीत राहून तो नागरी सेवांची तयारी करत होता.