नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील अनेक देश कोरोनाशी सामना करत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडाही पाच लाखांच्या वर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावणं आवश्यक आहे. मात्र आपल्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मास्क लावायला सांगणं एका महिलेला महागात पडलं आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने मास्क लावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी मास्क लावणं अनिवार्य करण्यात आलं असून न लावल्यास दंड आकारण्यात येत आहे. याच दरम्यान आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्याला मास्क लावण्याचा सल्ला दिला म्हणून एका दिव्यांग महिलेला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्य नेल्लोरमध्ये ही घटना घडली. सरकारी कार्यालयात एक कर्मचारी मास्क घालून आला नाही म्हणून त्याच्यासोबतच काम करणाऱ्या एका दिव्यांग महिला कर्मचाऱ्याने त्याला मास्क घालण्याचा सल्ला दिला. यावरून दोघांमध्ये थोडा वाद झाला. संतापाच्या भरात कर्मचाऱ्याने महिलेला मारहाण करायला सुरुवात केली. महिलेला वाचवण्यासाठी इतरही काही कर्मचारी आले मात्र त्या व्यक्तीने बेदम मारहाण सुरूच ठेवल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे.
कार्यालयात दिव्यांग महिलेला केलेल्या या मारहाणीचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तसेच घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी देखील या घटनेचा व्हिडीओ ट्विट केला आहे. केवळ मास्क लावण्याच्या विनंतीवरून आंध्र प्रदेश पर्यटन विभागाच्या एका कर्मचाऱ्याने दिव्यांग महिलेवर हल्ला केला. ही अत्यंत लाजीरवाणी घटना आहे असं देखील मालीवाल यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.