आंध्र प्रदेशमधील एका मंत्र्याच्या पत्नीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये ती एका पोलिसावर संतापली असल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना बराच वेळ वाट बघायला लावल्याने त्यांचा राग अनावर झाला. यावेळी त्यांनी पोलिसांच्या गणवेश आणि पगारावरही प्रश्न उपस्थित केला. सध्या तरी सरकारकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
एनडीटीव्हीच्या रिपोर्टनुसार, अन्नामया जिल्ह्यातील रायाचोटी येथे ही घटना घडली. आंध्र प्रदेश सरकारमधील मंत्री मंडीपल्ली रामप्रसाद रेड्डी यांच्या पत्नी हरिता रेड्डी या पेन्शनशी संबंधित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात होत्या. त्यानंतर कारमध्ये बसून त्या पोलिसांना ओरडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. तसेच पोलीस कर्मचारी शांतपणे ऐकत आहेत.
रिपोर्टनुसार, हरिता रेड्डी म्हणाल्या की, "तुला एवढा उशीर कसा झाला आणि अजून तुझी सकाळ झाली नाही का? तुमच्याकडे वर्दी नाही का? मला तुमची अर्धा तास वाट पाहावी लागली. SI देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये व्यस्त आहेत? तुम्हाला पगार कोण देतं?" आजूबाजूला मोठी गर्दी जमल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
सोशल मीडियावरही या घटनेबाबत अनेक प्रतिक्रिया येत आहेत. एका युजरने मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना टॅग केलं आणि असं वर्तन अपेक्षित नव्हतं असं म्हटलं आहे, मला आशा आहे की, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी शिष्टाचार राखण्याचा सल्ला द्याल. सध्या या व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.