आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील जाहीर सभेत रविवारी दुसऱ्यांदा चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. यापूर्वीही चंद्राबाबू नायडू यांच्या नेल्लोर येथील जाहीर सभेत चेंगराचेंगरी होऊन ८ जणांना जीव गमवावा लागला होता.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या रोड शोमध्ये पुन्हा एकदा चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुंटूर रॅलीदरम्यान ही घटना घडली. नायडू जाहीर सभेतून निघाल्यानंतर ही चेंगराचेंगरी झाली. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. टीडीपीने रेशन किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये मोठ्या संख्येने लोक आले होते. यापूर्वी, 28 डिसेंबर रोजी नायडू यांच्या कंदुकूर रॅलीदरम्यान चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू झाला होता.
यापूर्वी, 28 डिसेंबर रोजी आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कंदुकूर येथे तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरीत आठ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. विरोधी पक्षनेते एन. चंद्राबाबू नायडू बुधवारी रोड शोला संबोधित करत असताना कालव्यात पडल्याने काही लोकांचा मृत्यू झाला तर काही जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोकांमध्ये बाचाबाची होऊन चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली होती. नायडू यांनी या घटनेनंतर लगेचच त्यांची बैठक रद्द केली होती आणि प्राण गमावलेल्या कुटुंबीयांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.