आंध्र प्रदेश - आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एका गावात स्वाइन फ्लूमुळे दोन जणांचा मृत्यू झाल्याची प्रचंड अफवा पसरली आहे. या अफवेमुळे सध्या येथील गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कारण, स्वाइन फ्लू आजार पसरल्याच्या अफवेमुळे या गावावरच बहिष्कार टाकण्यात आला आहे. दरम्यान, संबंधितांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला नसल्याचं वैद्यकीय तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. पण तरीही शेजारील गावातील ग्रामस्थ डॉक्टरांचेही म्हणणं ऐकण्यास तयार नाहीत.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे संबंधितांचा मृत्यू झाला होता. वैद्यकीय तपासणीत आम्हाला स्वाइन फ्लूची लक्षण आढळली नाहीत. पसरलेल्या अफवांमुळे गावकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. लोकांचा गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितले.
नेमकी काय आहे घटना?
आठवड्या भरापूर्वी कृष्णा जिल्ह्यातील एका गावात 45 वर्षीय नामचार्या आणि 32 वर्षीय मरियम्मा यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचाही मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाल्याचे वृत्त पसरले. यामुळे या गावावर शेजारील गावांनी बहिष्कार टाकला. या गावातील स्थानिकांनी आरोप केला आहे की, जबरदस्तीनं आम्हाला प्रवासी बसमधून खाली उतरवलं जाते, लहान मुलांना घेण्यासाठी शाळेची बस येत नाही, दूध विक्री होत नाहीय, एवढंच नाही तर गावाच्या पाणीपुरवठ्यातही अडथळे निर्माण केले जात आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी येथील परिस्थितीची माहिती जाणून घेतली. गावातील तपासणी आणि शेजारील गावकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांचं एक पथक येथे रवाना करण्यात आले आहे. शिवाय, गावावर अद्यापही अन्याय सुरू असल्यास त्याविरोधात कारवाई करण्यात येणार, असं आश्वासन जिल्हा मुख्यालयाकडून देण्यात आले आहे.