आंध्र प्रदेशमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका वृद्धाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी मुलाने पैशांची मागणी केली. त्यानंतर मुलीनेच वडिलांचे अंत्यसंस्कार केले. वडिलांचा मृतदेह दारात पडून असताना, अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे मागण्याच्या मुलाच्या या कृत्यावर टीकेची झोड उठली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील पेनुगंचिप्रोलू येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गिंजुपल्ली कोटाया (80) हे मूळचे आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यातील पेनुगंचिप्रोलु मंडलातील अनिगंदलापाडू गावचे रहिवासी होते. मालमत्तेवरून पिता-पुत्रांमध्ये वारंवार भांडणे होत होती. कोटाया यांना त्यांची जमीन विकून एक कोटी रुपये मिळाले. ज्यात त्यांनी 70 लाख रुपये आपल्या मुलाला दिले आणि उर्वरित 30 लाख रुपये स्वतःकडे ठेवले. त्यामुळे त्यांचा मुलगा आनंदी नव्हता.
कोटाया यांचा मुलगा त्याला मिळालेले पैसे घेऊनही समाधानी नव्हता. तसेच उर्वरित 30 लाख रुपये देण्याची मागणी वडिलांकडे सातत्याने करत होता. पैसे न दिल्याने वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. त्याने वडिलांचे शारीरिक शोषणही केले. आपल्या मुलाचा छळ सहन न झाल्याने कोटाया आपल्या पत्नीसह मुलगी विजयालक्ष्मीच्या घरी गेले. तेव्हापासून हे दाम्पत्य त्यांच्या मुलीच्या घरी राहत होते.
कोटाया यांच्या मुलाला त्याच्या तब्येतीची अजिबात काळजी नव्हती. त्यांची मुलगी त्यांच्या तब्येतीची काळजी घेत होती. कोटाया यांचे वृद्धापकाळाशी संबंधित आजाराने निधन झाले. नातेवाईकांनी कोटाया यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलाला दिली. मात्र त्यांनी वडिलांच्या पार्थिवावर त्यांच्या घरी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"