भुवनेश्वर/विजयवाडा : तितली चक्रीवादळाने ओदिशा व आंध्र प्रदेशला गुरुवारी मुसळधार पावसासह तडाखा दिला. त्यामुळे या राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले असून त्यामुळे तिथे पूर येण्याची भीती आहे.या चक्रीवादळात दोन्ही राज्यांत १२ जणांचा बळी गेला. अनेक झाडे, विजेचे खांब कोसळले. त्यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण झाले. तसेच वीजपुरवठाही अनेक ठिकाणी खंडित झाला. ओदिशाचा गंजम व आंध्र प्रदेशच्या श्रीकाकुलम या जिल्ह्यांना तितली चक्रीवादळाचा सर्वात जास्त फटका बसला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, लांब पल्ल्याच्या काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्या. आंध्र प्रदेशमधील १६ जलप्रकल्पांचे वादळामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक गावांमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. (वृत्तसंस्था)नुकसान भरपाईआंध्रमध्ये मरण पावलेल्या आठ जणांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली आहे. वादळामुळे या राज्यात किती नुकसान झाले याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नायडू यांना दूरध्वनी करून जाणून घेतली. ओदिशातील तीन जिल्ह्यांतील ६० लाख लोकांना वादळाचा तडाखा बसला आहे.गेल्या तीन दिवसांपासून या परिसरात पाऊस कोसळत आहे. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राज्यातील स्थितीचा आढावा घेतला.
तितली चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओदिशात आता पुराची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 12:32 AM