विशाखापट्टणम: बंगालच्या उपसागरातील मोसमी उलथापालथीमुळे आंध्र प्रदेशातील परिस्थिती बिघडत चालली आहे. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे आतापर्यंत 33 जणांना जीव गमवावा लागला आहे, तर 12 जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. याशिवाय राज्यातील रेल्वे संपर्कावरही परिणाम झाला आहे. दक्षिण मध्य रेल्वेने सांगितले की, नेल्लोरजवळ पडुगुपडू येथे रेल्वे रुळांना तडे गेल्याने 100 हून अधिक एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून 29 गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
अनेक महामार्गावरील वाहतूक बंदपावसामुळे राज्यातील नद्या, जलप्रकल्पांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. त्याचवेळी चित्तूर, कडप्पा, अनंतपूर आणि नेल्लोरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. आंध्र प्रदेशात पेन्ना नदीला पूर आल्याने शेकडो वाहने आणि प्रवासी अडकले असून, महत्त्वाच्या महामार्गावरील वाहतूक बंद आहे. रेल्वेशिवाय बससेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. नेल्लोर आरटीसी बसस्थानकावर अनेक प्रवासी अडकून पडल्याचे वृत्त आहे.
शेकडो एकर पिके उद्धवस्तसरकारी आकडेवारीनुसार, पाऊस आणि पुरामुळे कडप्पामध्ये 20, अनंतपूरमध्ये 7, चित्तूरमध्ये 4 आणि एसपीएस नेल्लोरमध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला. नेल्लोर येथील सोमशिला जलाशयाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचवेळी कडप्पा जिल्ह्यात 12 जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. शेकडो एकरांवर पसरलेली पिके उद्ध्वस्त झाली, गुरे वाहून गेली आणि गावातील अनेक घरे मोडकळीस आली.
एनडीआरएफची पथके तैनातआंध्र प्रदेशातील तिरुपती शहराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. राज्यातील सर्वात मोठ्या जलाशयांना तडे गेल्याच्या बातम्यांनीही चिंता वाढवली आहे. मात्र, शहरात जोरदार पावसाची नोंद झाली नाही. एनडीआरएफच्या 10 व्या बटालियनने राजमपेट आणि तिरुपती येथे प्रत्येकी दोन पथके तैनात केली आहेत. एनडीआरएफच्या तिसऱ्या बटालियनच्या दोन पथकांना विशाखापट्टणममध्ये तयार राहण्यास सांगण्यात आले आहे.
मोठी वित्तहानीआंध्र प्रदेशातील चेन्नई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-16 हा आंध्र प्रदेशातील नेल्लोर आणि विजयवाडा आणि चेन्नई ग्रँड ट्रंक रेल्वेमार्ग, देशाच्या दक्षिण आणि पूर्वेकडील आणि उत्तरेकडील भागांना जोडणारा एक महत्त्वाचा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. . पुरामुळे रेल्वे ट्रॅक, रस्ते आणि हवाई वाहतुकीचे नुकसान झाले आहे. कडप्पा विमानतळ 25 नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.