विजयवाडा : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची महत्वाकांक्षा ही देशभरात भाजपविरोधी आघाडीचा विस्तार करणे आणि सीबीआयला राज्यात प्रवेशापासून रोखणे एवढीच मर्यादित नसल्याचे दिसून येत आहे. कारण, त्यांनी केलेल्या नव्या घोषणेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’पेक्षाही उंच अशी विधानसभेची इमारत अमरावतीमध्ये उभारण्याचे चंद्राबाबू यांनी जाहीर केले आहे.आंध्रप्रदेश विधानसभेची ही इमारत ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’पेक्षा ६८ मीटर अधिक उंच असणार आहे. ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’ची उंची १८२ मीटर आहे. नायडू यांनी विधानसभा इमारतीचे डिझाइन जवळपास निश्चित केले आहे. त्यात काही किरकोळ बदल करून राज्य सरकार ते ब्रिटनच्या नॉर्मा फॉस्टर्स आर्किटेक्टसला देणार आहे. नव्या इमारतीत तीन मजले असतील. तर, २५० मीटर उंच टॉवर असेल.उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत २०१ मीटर उंच भगवान रामाची प्रतिमा उभारण्याचे जाहीर केलेले आहे. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी ही घोषणा केली आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने माँ कावेरीचा १२५ फूट उंच पुतळा उभारण्याची तयारी सुरू केली आहे. (वृत्तसंस्था)अशी असेल संभाव्य इमारतचंद्राबाबू नायडू यांच्या प्रस्तावित विधानसभेच्या इमारतीचा आकार लिलीच्या उलट्या फुलासारखा असेल. सरकार यासाठी नोव्हेंबरमध्ये निविदा काढणार आहे. ही पूर्ण प्रक्रिया दोन वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. यात दोन गॅलरी असतील. एकाची लांबी ८० मीटर तर, दुसऱ्याची लांबी २५० मीटर असेल. नायडू यांनी भवनाच्या पाच अन्य इमारतींचे मॉडेलही तयार केले आहे.
आंध्र विधानसभा ‘स्टॅच्यू आॅफ युनिटी’पेक्षाही उंच असेल, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 5:19 AM