हैदराबाद - आंध्र प्रदेशमधील टीडीपी पक्षाचे आमदार किदारी सर्वेश्वर आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. माओवाद्यांकडून या दोन्ही आमदारांना गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. विशाखापट्टनम येथील अराकू प्रदेशात या आमदारांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने आंध्र प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे.
अरकु विधानसभा क्षेत्राचे आमदार किड़ारी सर्वेश्वर राव आणि माजी आमदार सिवेरी सोमा यांची माओवादियांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. विशाखापट्टनम जवळील अरकु मतदारसंघाचे आमदार किड़ारी सर्वेश्वर राव आणि सिवेरी सोमु आपल्या समर्थकांसह डुम्रिगुड़ा मंडळ येथील पीटिपुट्टाजवळ मायनिंग क्वेरीचा दौरा करक होते. त्याचवेळी, माओवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे महिला माओवाद्यांनी हा हल्ला केल्याची माहिती आहे. एओबी माओवादी संघटनेचे सचिव रामकृष्णा यांच्या नेतृत्वात 50 महिला माओवाद्यांनी आमदार सर्वेश्वर, माजी आमदार सोमा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला चढवला. दरम्यान, किडारी सर्वेश्वर यांनी 2014 च्या निवडणुकीत वायएसआर पक्षाकडून उमेदवारी मिळवत विजय मिळवला होता. त्यानंतर, सर्वेश्वर यांनी चंद्राबाबू नायडूच्या तेलगू देसम पक्षात प्रवेश केला होता.