रामदास आठवलेंच्या चारोळ्या अन...अमित शहा हे मराठी माणसाकरिता खलनायक ठरले आहेत. (‘स्पॉट अण्णा' अर्थात रामी रेड्डीसारखे दिसतात हा योगायोग!) त्यामुळे त्यांच्या मुंबईत सभा न लावण्याचा निर्णय भाजपाने घेतला. अतुल शहा सभा घेतात पण आपल्याला सभा घेता येत नाही या कल्पनेनं कासावीस झालेल्या अमित शहा यांची सभा घेण्याची हौस भागवण्याकरिता त्यांना थेट लोणावळ््याला धाडण्यात आलं. (लोणावळ््यात नवविवाह परिणीत जोडपी किंवा मद्याचरणीत समूह जमत असतात. तिकडं सभा ऐकायला कोण येणार?) बरं शहा यांच्या जोडीला रिपाइंचे शीघ्रकवी रामदास आठवले यांना धाडल्यानं शहा यांची हौस पुरती फिटली आहे. (बाद‘शहा'ला धडा शिकवायला अनेक भाजपाई टपल्येत त्याचाच हा पुरावा)‘उमेदवारांच्या पाठी उभे आहेत शहा, रिपाइंचे विधानसभेत आमदार जाणार दहा',‘मराठी माणूस आवडीनं खातो बोंबील,विजयाच्या दिवशी शहांच्या तोंडात रामदास पेढा कोंबील',‘अमितभाईंकरिता राखीताईंनी केला खाकरा,विधानसभा निवडणुकीत मनसेला ठोकरा'.रामदास आठवले यांच्या दिवसभराच्या चारोळ््यांच्या रतीबाने शहा आरोळ््या ठोकायचे तेवढे बाकी आहेत. आता शहांना कार्यकर्ते ‘कुठं कुठं जायाचं सभेला...' असं विचारताच ते मगनलालच्या चिक्कीचा भलामोठा तुकडा जिभेवर ठेवून चघळत राहतात.कुठं नेऊन ठेवलं भाजपाला!नरेंद्र मोदी यांनी बीडमधील सभेत गोपीनाथ मुंडे हयात असते तर आपण महाराष्ट्रात प्रचाराला आलो नसतो, असे विधान करून महाराष्ट्र भाजपातील भाऊबंदकीचा नवा अध्याय लिहिला आहे. नितीनभाऊ, नाथाभाऊ, सुधीरभाऊ, देवेंद्रभाऊ अशी ‘भाऊगर्दी’ भाजपात असतानाही नरेंद्रभाईंनी गोपीनाथरावांना मरणोत्तर प्रशस्तीपत्र देऊन आपल्यावर अविश्वास व्यक्त का केला, असा प्रश्न या भाऊगर्दीला पडला. सोशल मीडियावर लागलीच फिरलेल्या अनेक संदेशात ‘मोदींचा महाराष्ट्रातील नेत्यांवर अविश्वास' असा ठळक उल्लेख केला गेला होता. हे संदेश स्वपक्षातील एखाद्या भाऊने पसरवून हा ‘विनोद' केला की शत्रूपक्षातील मराठी, मराठा मावळ््यांनी, याचा शोध सुरु झाला. बराच शोध घेतल्यावरही या संदेशाचे उगमस्थान सापडले नाही. शेवटी कुठं नेऊन ठेवणार आहे हा सोशल मीडिया भाजपाला, असा हताश सूर शोधकर्त्यांनी लावला.
किस्सा कुर्सी का...
By admin | Published: October 07, 2014 5:25 AM