कोलकाता : एका महिलेला प्रसूतीच्या कळा असाह्य झालेल्या असताना, तिला रुग्णालयात दाखल करण्यासाठी व बाळंतपण नीट पार पाडण्यासाठी एक डॉक्टर देवदूत बनून आला. या महिलेने जन्म दिलेल्या गोंडस बाळाचे नाव त्या डॉक्टरने ‘कोरोनाश’ म्हणजे कोरोनाचा नाश करणारा असे ठेवले आहे.कारचालकाची नोकरी करणाऱ्या व्यक्तीची पत्नी असलेल्या शिखा मंडल हिला ७ एप्रिलला सकाळी प्रसूती वेदना होऊ लागल्या. कोरोना साथीमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व वाहतूक ठप्प असल्याने तिला रुग्णालयात नेण्यासाठी वाहन मिळत नव्हते. त्यामुळे शिखाचा पती गौरवने काही मित्रांच्या सल्ल्यावरून कोलकाताच्या ठाकूरपुकूर भागातील डॉ. कौशिक रायचौधरी यांच्याकडे धाव घेतली. अत्यंत कनवाळू स्वभावाच्या या डॉक्टरांनी शिखाला रुग्णालयात नेण्यासाठी आपली कार तिच्या पतीला देऊ केली. डॉक्टर कौशिक रायचौधरी यांनी एका खासगी रुग्णालयाला दूरध्वनी करून तिथे शिखा मोंडलला दाखल करून घेण्याची व्यवस्था केली. या रुग्णालयात अत्यंत कमी खर्चात हे बाळंतपण पार पाडले.फीचा एक पैसाही घेतला नाहीशिखा मोंडलने ७ एप्रिल रोजी संध्याकाळी जन्म दिलेल्या बाळाचे परोपकारी डॉक्टर कौशिक रायचौधरी यांनी त्याच दिवशी ‘कोरोनाश’ असे नामकरण केले. शिखावर केलेल्या उपचारांबद्दल डॉक्टर कौशिक यांनी फी म्हणून एक पैसाही घेतला नाही. या डॉक्टरांनी केलेले उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही असे शिखा मोंडल व तिचा पती गौरवने म्हटले आहे. डॉ. कौशिक यांनी सांगितले की, सध्या संकटकाळात सर्वच जण घाबरले असून आपल्या कर्तव्यापासून दूर पळत आहेत. अशामुळे समाजाचे खूप नुकसान होत आहे. अशा वातावरणात एक डॉक्टर म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडले.
बाळंतपणासाठी डॉक्टर बनला देवदूत, फीचा एक पैसाही घेतला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 5:43 AM