लखनौ - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगर येथील भाषणात वापरलेल्या अब्बाजान या शब्दाप्रयोगावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. योगी यांनी एका विशिष्ट समाजाल उद्देशून हा शब्दप्रयोग केला असून, हा समाज नाराज झाला आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांविरुद्ध सीजेएम कोर्टात सोमवारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे. अहियापूर ठाणे परीक्षेत्रातील भीखनपूर गावच्या सामाजिक कार्यकर्त्या तमन्ना हाश्मी यांनी दाखल केली आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अब्बाजान हा शब्दप्रयोग करून, एका विशिष्ट समाजाची बदनामी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. न्यायालयात सुनावणीसाठी ही याचिका घेण्यात आली असून 21 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी कुशीनगर परिसरात एकूण १२० कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण केलं. त्यावेळी, भाषणात अब्बाजान शब्दप्रयोग करत त्यांनी समाजवादी पक्षावर निशाणा साधला. मात्र, त्यांच्या या वक्तव्याने आता चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
काय म्हणाले होते योगी
मुख्यमंत्री यांनी समाजवादी पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. "अब्बाजान म्हणणारे सर्वजण गरीबांचा राशन हडपायचे. कुशीनगरचा राशन तेव्हा थेट नेपाळ, बांगलादेश पर्यंत पोहोचत होतो. कुशीनगर परिसरत शेती, धर्म आणि श्रद्धा यासाठी ओळखला होता. जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघात जाणं बाकी आहे. एकूण चारशे कोटींपेक्षा अधिकच्या योजनांचं लोकार्पण करायचं आहे. हे लोकार्पण तर नुसता ट्रेलर आहे. अद्याप बरंच काही होणं बाकी आहे. भगवान बुद्ध यांना समर्पित मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी देखील जरुर येणार आह", असे योगींनी म्हटले होते.
कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद केलं
कोरोना विषाणू विरोधात अतिशय नेटानं प्रतिकार केल्याचा दावा करताना योगी आदित्यानाथ यांनी कुशीनगर येथील जनसभेला संबोधित करताना एक आश्चर्यकारक विधान केलं आहे. "देशातील इतर राज्यांची सरकारं कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. पण आम्ही तर कोरोनाच्या भुताला बाटलीत बंद करुन टाकलं आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेचं मोठं नुकसान केलेलं असलं तरी आम्ही केंद्र सरकारच्या साथीनं जनतेच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं आहे", असं योगी आदित्यनाथ म्हणाले.