नवी दिल्ली - अॅड फिल्ममेकर राम सुब्रहमण्यम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संताप व्यक्त केला असून, मोदींचा उल्लेख मुर्ख आणि नरसंहारी असा केला आहे. राम सुब्रहमण्यम प्रसिद्द अॅड फिल्ममेकर आहेत. राम सुब्रहमण्यम यांनी पंतप्रधान मोदींच्या एका वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना टीका केली आहे. पण टीका करताना राम सुब्रहमण्यम यांनी मर्यादेचं उल्लंघन करत अपशब्द वापरले आहेत. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका सभेत नरेंद्र मोदींनी जे लोक बुलेट ट्रेनचा विरोध करत आहेत, त्यांनी बैलगाडीने प्रवास करावा असं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर राम सुब्रहमण्यम भडकले आहेत. याच वक्तव्यावरुन राम सुब्रहमण्यम यांनी मोदींवर हल्लाबोल करत ट्विट केलं आहे.
राम सुब्रहमण्यम यांनी लिहिलं आहे की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य म्हणजे माझा विरोध करणा-यांनी पाकिस्तानात जावं असं म्हणण्यासारखा आहे'. पुढे त्यांनी लिहिलं आहे की, तुम्ही मुर्ख आणि नससंहार करणारी व्यक्ती आहात. देश चालवण्यासाठी तुम्ही अयोग्य आहात असं मला वाटतं. तुम्ही एक पीआर एजन्सी चांगल्या प्रकारे चालवू शकता पण देश नाही'.
राम सुब्रहमण्यम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अशा शब्दांत टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी पद्मावती चित्रपटावरुन झालेल्या वादावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बूट भिरकावणा-या व्यक्तीला एक लाख रुपये बक्षिस देण्याची घोषणा त्यांनी केला होता. कलाकारांविरोधात जारी केलेल्या फतव्यांवर बोलताना त्यांनी हा राग व्यक्त केला होता.
'बुलेट ट्रेनला विरोध करणा-यांनी बैलगाडीतून प्रवास करावा' बुलेट ट्रेन प्रोजेक्टला विरोध करणा-यांनी बैलगाडीने प्रवास करावा असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लगावला आहे. काँग्रेसने अहमदाबाद - मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टला आपला विरोध दर्शवला असून, त्याच पार्श्वभुमीवर नरेंद्र मोदींनी हा अत्यंत कमी किंमतीत प्रोजेक्ट पुर्ण होत असल्याचं सांगत काँग्रेसला उत्तर दिलं. काँग्रेस सरकारलाही हा प्रोजेक्ट करण्याची इच्छा होती, पण अयशस्वी ठरले. म्हणून आता विरोध करत आहेत असा टोला नरेंद्र मोदींनी लगावला.
'जे बुलेट ट्रेन प्रोजेक्टला विरोध करत आहेत, त्यांनी बैलगाडीने प्रवास करावा. आमची काही हरकत नाही', असं नरेंद्र मोदींनी म्हटलं. गुजरातमध्ये नर्मदा नदीच्या तिरावर अमोद साखर कारखान्याजवळ पार पडलेल्या रॅलीत बोलताना नरेंद्र मोदींनी ही टीका केली.