अहमदाबाद: सोशल मीडियावर दररोज अनेक रंजक प्रसंगाचे आणि घटनांचे व्हिडीओज व्हायरल होत असतात. सध्या गुजरातच्या भरुच येथील एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड आकर्षणाचा विषय ठरत आहे. रस्त्यावरून चालत असणाऱ्या एका महिलेला बैलाने ढुशी मारून काही फूट हवेत उडवल्याचा व्हिडीओ आहे. एरवी बैल हा तसा शांतताप्रिय प्राणी समजला जातो. मात्र, अनेकदा काही कारणांमुळे ते हिंसक होऊ शकतात. या व्हिडीओतदेखील असाच काहीसा प्रकार घडल्याचे दिसत आहे.सुरुवातीला हा बैल रस्त्यावरून शांतपणे चालत होता. तो कोणावर हल्ला करेल, अशी कल्पनादेखील आजुबाजूच्या लोकांनी केली नसेल. त्याचवेळी काही अंतरावर पिवळ्या रंगाची साडी घातलेली एक महिला रस्त्यावरून चालत होती. हा बैल मागच्या बाजूचा रस्ता पार करून महिलेच्या पाठीमागे पोहोचला. काही अंतरावर असताना बैल अचानक आक्रमक झाला आणि त्याने जोरात धावत जाऊन महिलेला शिंगांवर उचलून हवेत फेकून दिले. ही धडक इतकी जोरदार होती की, महिला हवेत तब्बल पाच ते सात फूट उंचावर फेकली गेली आणि काही अंतरावर रस्त्याच्या कडेला जाऊन पडली. हा प्रकार पाहून आजुबाजूचे लोकही काही वेळासाठी घाबरले होते. परंतु, महिलेला धडक मारल्यानंतर बैल शांतपणे तसाच पुढे निघून गेला. त्यामुळे हा बैल अचानक थोड्यावेळासाठी इतका हिंसक का झाला, असा प्रश्न अनेकांना पडला.
VIDEO: अन्... रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला बैलाने हवेत उडवले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2018 8:47 AM