मुलाला चावल्याचा राग; संतापलेल्या बापाने कापले कुत्र्याचे पाय, पोलिसांत तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:26 AM2021-12-02T11:26:33+5:302021-12-02T11:27:01+5:30
या क्रुर घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे, ज्यात आरोपी कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे.
भोपाळ:मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यात एका माणसाने माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले आहे. आपल्या मुलाला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतला, त्यामुळे रागाच्या भरात त्या व्यक्तीने कुत्र्याचे पाय कापून त्याला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितल्यानुसार, ही घटना सुमारे एक महिन्यापूर्वी सिमरिया ताल गावात घडली होती, पण रविवारी कुत्र्याला मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आरोपीविरोधात तक्रार दाखल
दुरुन चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये माणूस कुत्र्याला दोरीने बांधून लोखंडी रॉने मारहाण करताना दिसत आहे. काही वेळानंतर तो व्यक्ती धारदार शस्त्राने कुत्र्याचे पाय कापून त्याला ठार करतो. यावेळी वेदनेने व्हिवळणाऱ्या कुत्र्याच्या वेदना त्या पाषणह्रदयी माणसाला कळत नाहीत. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पीपल फॉर अॅनिमल्सच्या कार्यकर्त्याने ग्वाल्हेर पोलिसांकडे याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.
कुत्र्याने मुलाला चावल्याचा राग
पोलिस अधीक्षक अमित सांघी यांनी पीटीआयला सांगितले की, तक्रारीनंतर त्या व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कुत्र्याने त्या व्यक्तीच्या मुलावर हल्ला करुन त्याचा चावा घेतला होता. यामुळे संतापलेल्या आरोपी सागर विश्वासने त्या कुत्र्याला निर्घृणपणे ठार केले. या घटनेनंतर त्या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर राहण्यासाठी नोटीस बजावली जाईल. पीपल फॉर अॅनिमल्स या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्या छाया तोमर यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहिता 429 (पाशवी वर्तन, विषबाधा, अपंगत्व, हत्या) आणि प्राण्यांवरील क्रूरतेची कलमे दाखल केली आहेत. आरोपींविरुद्ध प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.