मुंबई: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं आज मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानं ८ जानेवारीला त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्यांना न्युमोनिया झाला. शनिवारी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह देशातील दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे. 'लताजींसारखा कलाकार शतकांतून एकदा जन्माला येतो. लता दीदी या उत्तम माणूस होत्या. त्यांचा स्वर्गीय आवाज आता कायमचा शांत झाला आहे. पण त्यांचं गाणं अमर राहील. माझ्या सहवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत,' अशा शब्दांत कोविंद यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
मी माझं दु:ख शब्दांत व्यक्त करू शकत नाही, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केल्या. 'दयाळू आणि काळजी करणाऱ्या लतादीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यामुळे देशात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती,' अशा शब्दांत मोदींनी लतादीदींना आदरांजली वाहिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीदेखील लतादीदींच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं. 'देशाची शान, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झालं आहे. संगीताची साधना करणाऱ्यांसाठी त्या सदैव प्रेरणा राहिल्या. लता दीदींचा स्वभाव अतिशय शांत होता. संपूर्ण देशवासीयांप्रमाणे मलाही त्यांचं संगीत आवडायचं. मला जेव्हाही वेळ मिळायचा, तेव्हा मी त्यांची गाणी ऐकायचो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,' अशा शब्दांत गडकरींनी लतादीदींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.