नवी दिल्ली: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेल डीलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत लक्ष्य करत असताना या प्रकरणातील एक मोठी माहिती समोर आली आहे. फ्रेंच वृत्तपत्र ले माँडच्या दाव्यानुसार, राफेल करारानंतर फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी अनिल अंबानींच्याफ्रान्समधील टेलिकॉम कंपनीला 143.7 मिलियन युरोंची करमाफी दिली. हा वाद फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2015 मध्ये संपुष्टात आला. याच कालावधीत भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानांच्या खरेदीसाठी करार सुरू होता. 'फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2015 दरम्यान राफेल लढाऊ विमान खरेदीसाठी करार सुरू होता. त्यासाठी भारत आणि फ्रान्समध्ये बातचीत सुरू होती. त्याच काळात अनिल अंबानींच्या कंपनीचा 143.7 मिलियन युरोंचा (1120 कोटी रुपये) कर माफ करण्यात आला,' असं वृत्त ले माँडनं दिलं आहे. अनिल अंबानींची रिलायन्स डिफेन्स कंपनी राफेल करारातील ऑफसेट भागीदार आहे. पंतप्रधान मोदींनी एप्रिल 2015 मध्ये राफेल कराराची घोषणा केली. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स अटलांटिक फ्लॅग फ्रान्स कंपनीची फ्रान्सच्या कर अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू होती, असा दावा ले माँडनं केला. 2007 ते 2010 या कालावधीतील 60 मिलियन युरोचं कर्ज भरण्याची सूचना कंपनीला करण्यात आली. यानंतर अनिल अंबानींच्या कंपनीनं 7.6 मिलियन युरो भरण्याची तयारी दर्शवली. मात्र फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला आणि आणखी एक चौकशी सुरू केली. यानंतर 2010 ते 2012 या कालावधीतील व्यवहारांची चौकशी करण्यात आली. यानंतर कंपनीला 91 मिलियन युरो इतका कर भरण्याच्या सूचना करण्यात आल्या. त्यामुळे अंबानींना एकूण 151 मिलियन युरोंचा कर भरायचा होता. मात्र राफेल कराराची घोषणा होताच फ्रान्सच्या कर अधिकाऱ्यांनी केवळ 7.3 मिलियन युरो स्वीकारले.
राफेल डीलनंतर अनिल अंबानींना 1120 कोटींची करमाफी; फ्रेंच मीडियाच्या दाव्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 3:35 PM