काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी संरक्षण मंत्री एके अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांनी गुरुवारी भाजपत प्रवेश केला आहे. केरळकाँग्रेसच्या सोशल मिडिया टीमचे माजी संयोजक अनिल अँटोनी यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, व्ही मुरलीधरन, केरळ बीजेपी अध्यक्ष के सुरेंद्रन यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंटा हाती घेतला आहे.
2002 मधील गुजरात दंगल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवर वाद झाल्यानंतर, अनिल अँटोनी यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेसला गुड बाय केले होते. महत्वाचे म्हणजे, अनिल अँटोनी यांचे वडील एके अँटोनी हे काँग्रेस सरकारमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री होते. याशिवाय ते केरळचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. तसेच, एके अँटोनी यांचे नाव मोठ्या नेत्यांमध्ये घेतले जाते.
काँग्रेस सोडण्यापूर्वी अनिल अँटोनी यांच्याकडे केरळमध्ये पक्षाच्या सोशल मीडिया सेलची जबाबदारी होती. अनिल यांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी बीबीसीची डॉक्यूमेंट्री पक्षपाती असल्याचे म्हटले होते.