नवी दिल्ली: काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी संरक्षणमंत्री एके अँटनी यांचा मुलगा अनिल अँटनी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर एके अँटनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. 'अनिलचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय चुकीचा आहे. त्याच्या या निर्णयामुळे मला खूप त्रास झालाय', असे ते म्हणाले.
शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत...एकेअँटनी पुढे म्हणतात, 'भारताची एकता हिच धर्मनिरपेक्षता आहे. 2014 पासून देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण, मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या प्रयत्नांविरुद्ध लढणार आहे. 2014 मध्ये विध्वंसाची गती कमी होती, पण 2019 पासून त्याला वेग आला आहे. मी 82 वर्षांचा आहे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेससोबत राहणार,' असेही ते यावेळी म्हणाले.
गांधी घराणे...अँटनी पुढे म्हणतात, 'भाजप देशाच्या संवैधानिक मूल्यांचा ऱ्हास करत आहे. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आरएसएस आणि भाजपच्या सर्व चुकीच्या धोरणांना विरोध करणार आहे.' गांधी घराण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, 'स्वातंत्र्यापासून नेहरू कुटुंबाने जात, धर्माची पर्वा न करता भारतीयांच्या एकतेची काळजी घेतली. सध्याचे गांधी घराणेही ही परंपरा पुढे चालवत आहे. गांधी कुटुंब काँग्रेसच्या मूल्यांसाठी सतत लढत आहे. म्हणूनच मी गांधींचे नेतृत्व स्वीकारत आहे.'
संबंधित बातमी- काँग्रेसला मोठा धक्का! दिग्गज नेते ए के अँटोनी यांचे पुत्र अनिल अँटोनी यांचा भाजपत प्रवेश