नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास जाहीर झाला आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. यातच नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी मंगळवारी दिल्ली विधानसभा विसर्जित केली आहे.
एका अधिकाऱ्याने याबाबत सांगितले की, नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी 11 फेब्रुवारीपासून राष्ट्रीय राजधानी असलेल्या दिल्लीची सहावी विधानसभा विसर्जित केली. तसेच, दिल्ली विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर सातवी विधानसभा गठीत करण्यासाठी नवीन अधिसूचना जारी करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. आम आदमी पार्टीने 56 हून अधिक मतदारसंघांमध्ये आघाडी घेतली आहे. तर भारतीय जनता पार्टी 14 जागांवर पुढे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दिल्लीत केजरीवाल सरकार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसला या निवडणुकीत यश मिळवता आले नाही. सध्या काँग्रेसला एकाही मतदारसंघात आघाडी नाही. त्यामुळे यंदाही काँग्रेस भोपळा फोडण्याची शक्यता कमीच आहे.
आप कार्यकर्त्यांचा जल्लोष दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी पुन्हा एकदा मोठा विजय मिळवण्याच्या मार्गावर आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यालयात आपचे कार्यकर्ते जल्लोष करत असून, कार्यकर्ते ढोलताशांच्या गजरात नाचत आहेत.