मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे वादात सापडलेल्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंगळवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीला हजर राहावे लागेल. त्यांना पाठविलेल्या दुसऱ्या समन्समध्ये चौकशीचा विषय नमूद केला असल्याने त्यांना आता हजर राहावेच लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
ईडीने शनिवारी चौकशीला हजर राहण्यास बोलाविले असताना देशमुख यांनी समन्समध्ये चौकशी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, अशी वकिलामार्फत विचारणा करीत चाैकशीला जाण्याचे टाळले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याच दिवशी त्यांना पुन्हा समन्स बजाविले. त्यामध्ये मुंबईतून हप्ता वसुली व बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याबद्दल चौकशी करायची असल्याचे नमूद केले आहे. ईडीने याबाबत संबंधितांकडून केलेल्या तपासातून अनेक बाबी समोर आल्या आहेत, त्याबाबत देशमुख यांच्या जबाब नोंदविला जाईल, त्यासाठी २९ जून रोजी ११ वाजता हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आली आहे. देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पालांडे व सहायक कुंदन शिंदे हे ईडीच्या कोठडीत आहेत.