नवी दिल्ली - देशात कोरोनाच कहर पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. यानंतर मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं. एम्समध्ये कोरोना लस घेतल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिली. पंतप्रधानांनी भारत बायोटेक कंपनीच्या कोव्हॅक्सिनचा (Covaxin) पहिला डोस घेतल्याचं सांगण्यात येत आहे. याच दरम्यान हरियाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी (Anil Vij) लस घेणार नसल्याचं म्हटलं आहे.
अनिल वीज हे कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये सहभागी झाले होते. ट्रायलमध्ये त्यांनी कोरोना लस घेतली होती. पण आता जेव्हा प्रत्यक्षात लसीकरण सुरू झालं आहे, तेव्हा मात्र त्यांनी लस घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. यामागचं नेमकं कारण देखील त्यांनी सांगितलं आहे. "आज सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. निसंकोचपणे लस घ्या. मला लस घेता येणार नाही कारण कोरोना इन्फेक्शन झाल्यानंतर माझ्या शरीरातील अँटिबॉडी 300 झाल्या आहेत आणि या भरपूर आहेत. कदाचित ट्रायलमध्ये मी लस घेतली त्यामुळे माझ्या शरीरातील अँटिबॉडी वाढल्या असाव्यात. आता मला लस घेण्याची गरज नाही" असं अनिल वीज यांनी म्हटलं आहे.
अनिल वीज यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच कोरोना लस आता न घेण्यामागचं नेमकं कारण देखील सांगितलं आहे. वीज यांनी सामान्य जनतेला लस घेण्याचं आवाहन देखील केलं आहे. कोरोनावरील लस उपलब्ध झाली असली तरी अनेकांच्या मनात शंका आहे. कोरोनावरील लस किती प्रभावी ठरेल, त्यामुळे काही साईड इफेक्ट्स तर होणार नाहीत ना, असे अनेक प्रश्न देशवासीयांच्या मनात आहे. ते दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) कोरोनावरील लस (Corona Vaccine) घेतली. तसेच आपण देशाला कोरोनामुक्त करू, असा निर्धारदेखील त्यांनी व्यक्त केला.
फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण
मोदींनी लस घेतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. पण लस घेताना पंतप्रधानांच्या चेहऱ्यावर मास्क नसल्याने अनेकांनी यावरून निशाणा साधला आहे. मोदींनी पोस्ट केलेल्या फोटोखाली काहींनी मास्क न घातल्याबद्दल आक्षेप नोंदवला आहे. मोदींनी मास्क न लावल्यामुळे नेटकरी संतापले असून मोदींवर निशाणा साधण्यात येत आहे. मास्क लावण्य़ाची आठवण करून देण्यासाठी काहींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांचा फोटो शेअर केला आहे. बायडन यांनी लस घेताना मास्क लावलेला फोटोही पोस्ट करत टोला लगावला आहे.
बापरे! '...तर यंदाची होळी ठरू शकते 'सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा
देशात सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास यंदाची होळी ही "सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना' ठरू शकेल असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगण आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे. कोरोनाच्या बाबतीत आता जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यांपासून दूर राहिलं पाहिजे. विशेषत: होळीच्या वेळी. कारण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही.