पाटणा : बिहारमधील मधुबनीच्या साक्री प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय दुरवस्था झाली आहे. येथील कर्मचारी महिन्यातून केवळ एक दिवस येथे येतात. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, हे रुग्णालय १५ ऑगस्ट, २६ जानेवारी अशा दिवशीच खुले राहते. काही ग्रामस्थांनी सांगितले की, ३० वर्षांपासून हे आरोग्य केंद्र नावालाच सुरू आहे. येथे रुग्णांवर उपचार होत नाहीत. याचा उपयोग गोशाळा म्हणून केला जातो. येथे डॉक्टर, नर्स व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती तर होते; पण येथे कोणीच येत नाही.बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर मागील आठवड्यात जवळपास ४० मृतदेह आढळले होते. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याचे सांगितले जात होते, तसेच हे मृतदेह उत्तर प्रदेशमधून वाहून आल्याचा दावाही प्रशासनाने केला होता.
राजदची टीका राजदने सीतामढीच्या पुपरी येथील बांधकाम सुरू असलेल्या हॉस्पिटलची छायाचित्रे शेअर केली होती. राजदने म्हटले आहे की, हे बांधकाम २००६ पासून सुरू आहे आणि अद्याप पूर्ण झालेले नाही. विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी लोकांना याची आठवण करून दिली आहे की, नितीशकुमार हे १५ वर्षांपासून मुख्यमंत्री असून, त्यांच्या राज्यात हे सुरू आहेत.