तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी असल्याचा आरोप करत आंध्र प्रदेशातील सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने विरोधीपक्ष असलेल्या वायएसआर काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात हे लाडू अर्पण केले जातात. मंदिराचे व्यवस्थापन तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) द्वारे केले जाते.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये केंद्र सरकार द्वारे चालवल्या जाणाऱ्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या पशुधन व अन्न विश्लेषण आणि अध्ययन केंद्राच्या प्रयोगशाळेने यासंदर्भात एक अहवाल दिला आहे. काय आहे लॅब अहवाल? -अहवालानुसार, वायएसआरसीपी सत्तेत असताना प्रसिद्ध तिरुपती मंदिरात प्रसादाचे लाडू बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात प्राण्यांची चरबी आढळून आली. तुपात फिश ऑइल, बीफ फॅट आणि चरबीचे अंश आढळून आले होते. तसेच, चरबी एक अर्ध-घन पांढरे चरबी उत्पादन आहे, जे डुकरांच्या चरबीयुक्त उतकांपासून घेतले जाते. तिरुपती लाडूवरून आरोप -तिरुपती मंदिरात प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूंसंदर्भातील लॅबच्या अहवालानंतर, आंध्र प्रदेशात राजकीय वादळ निर्माण झाले आहे. यामुद्द्यावरून मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी वायएस जगन मोहन रेड्डी यांना कोंडीत पकडत, आरोप केला होता की, मागील वायएसआरसीपी सरकारने तिरुमला येथे तिरुपती लाडू प्रसादम तयार करण्यासाठी तुपाऐवजी प्राण्यांची चरबी वापरली. हा प्रसाद भगवान व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना दिला जातो. एवढेच नाही तर, तिरुमलाचे लाडू देखील निकृष्ट साहित्यापासून तयार करण्यात आले होते, असा आरोपही त्यांनी केला होता.
अमरावती येथे एनडीए विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला संबोधित करताना मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असेही म्हटले होते की, लाडू तयार करण्यासाठी आता शुद्ध तुपाचा वापर केला जात आहे आणि मंदिरातील प्रत्येक गोष्ट सॅनिटाइज करण्यात आली आहे. यामुळे गुणवत्तेतही मोठा सुधार झाला आहे.
दरम्यान, यासंदर्भात बोलताना वायएसआरसीपीचे ज्येष्ठ नेते बी. करुणाकर रेड्डी गुरुवारी (19 सप्टेंबर) म्हणाले, सीएम नायडू यांनी केवळ राजकीय फायदा मिळवण्यासाठी तिरुपती मंदिरातील लाडू बनवताना निकृष्ट साहित्य आणि प्राण्यांची चरबी वापरल्याचा आरोप केला आहे. करुणाकर रेड्डी यांनी आरोप केला की नायडू यांनी विरोधी पक्ष आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांना टार्गेट करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले आहे.